स्वच्छता मोहिमेत नागरिकांनाही सहभागी करावे; आयुक्त सौरभ राव यांनी वागळे परिसरात राबविली स्वच्छता मोहिम
By अजित मांडके | Published: April 13, 2024 02:10 PM2024-04-13T14:10:36+5:302024-04-13T14:11:12+5:30
शहर स्वच्छतेबाबत नागरिकांचा सहभाग व सहकार्य प्राप्त करणे गरजेचे.
अजित मांडके, ठाणे :ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध प्रभागसमितीअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा सहभाग महत्वाचा असून नागरिकांचे सहकार्य प्राप्त् करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे स्वच्छता मोहिम ही अधिक व्यापक प्रमाणात राबविण्यासाठी प्रत्येक विभागातील स्वयंसेवी संस्था, नागरिक यांना या मोहिमेत सहभागी करुन ही मोहिम सातत्याने सुरू ठेवावी अशा सूचना आयुक्त सौरभ राव यांनी शनिवारी दिल्या.
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात स्वच्छता अभियान हे प्रत्येक प्रभागसमिती क्षेत्रात सुरू असून वागळे प्रभागसमिती कार्यक्षेत्रात आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत ही मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, जी.जी. गोदेपुरे, शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण गरुडकर यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच सफाई कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
वागळे इस्टेट परिसरातील किसननगर येथून या स्वच्छता अभियानास सुरूवात झाली. या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक शौचालयाची राव यांनी पाहणी करुन शौचालयाच्या आजूबाजूच्या परिसरात असलेला राडारोडा तसेच कचरा कुंडीतील कचरा हा नियमित उचलावा व शौचालयाचा परिसर स्वचछ ठेवण्याचे निर्देश संबंधित स्वचछता निरिक्षकांना दिले. तसेच शौचालयात नियमित पाणी असेल याचीही काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. रोड नं. २२ येथील किसननगर आदिवासी गार्डन संप व पंप हाऊस परिसराची देखील आयुक्तांनी पाहणी केली, तसेच गार्डनमधील नादुरूस्त असलेली लहान मुलांची खेळणी दुरूस्त करण्याचे सुचित केले.
किसननगर येथील नाल्याची पाहणी करत असताना पावसाळयापूर्वी नाल्याची साफसफाई होईल या दृष्टीने कार्यवाही करावी. यावेळी येथील कचरावेचक महिलांशी आयुक्तांनी संवाद साधला असताना या महिलांनी त्यांना भेडसावत असलेल्या समस्या, तुटपुंजे पैसे याबाबतच्या व्यथा मांडल्या. कचरा वेचक महिलांनी उदरनिर्वाहासाठी नियमित रोजगार मिळावा अशी मागणी आयुक्तांकडे केली असता, याबाबत समाजविकास विभागाच्या योजनांची माहिती घेवून कचरावेचक महिलांना रोजगार मिळेल या दृष्टीने विचारविनीमय करावा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
ही स्वच्छता मोहिम दालमिल नाका ते २२ नं सर्कल, दालमिल नाका ते राजीव गांधी हॉटेल ते सायबर टेक ते गोल्डन नेस्ट, किसननगर शाखा ते अंतर्गत उपरस्ते ते रोड नं १६ ते शाळा क्र. २३, आयटीआय सर्कल ते रामनगर, केबीपी कॉलेज रोड, जुना पासपोर्ट ते हाजुरी सर्कल ते मिल रोड व उपरस्ते आदी ठिकाणी राबविण्यात आली.
ठाणे मनपा शाळेची केली पाहणी-
किसननगर येथे ठाणे महापालिकेच्या शाळा क्र. २३ व १०२ ला भेट दिली. यावेळी शाळेच्या संगणक कक्षास भेट देवून तेथील शिक्षकांशी संवाद साधला. तसेच सद्यस्थितीत शाळेत विद्यार्थ्यांसाठी डीमार्टच्या माध्यमातून उन्हाळी शिबिर सुरू असून या शिबिरातील विद्यार्थ्यांशी आयुक्तांनी चर्चा केली. शिबिरात काय शिकविले जाते, मुलांना काय शिकायला आवडेल असे प्रश्न विचारुन विद्यार्थ्यांनी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. विद्यार्थ्यांनीही आयुक्तांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच त्यांनी रेखाटलेल्या चित्रांचे कौतुकही केले.