नागरिकांनी प्लास्टिक, कागदी ध्वजाचा वापर टाळावा; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

By सुरेश लोखंडे | Published: August 14, 2023 04:21 PM2023-08-14T16:21:39+5:302023-08-14T16:26:40+5:30

ठाणे : जिल्ह्यात दरवर्षी २६ जानेवारी, १५ ऑगस्ट या राष्ट्रीय सणाच्या दिवशी त्याचप्रमाणे १ मे या महाराष्ट्र दिनी आणि ...

Citizens should avoid using plastic and paper flags, District Collector appeals to thane | नागरिकांनी प्लास्टिक, कागदी ध्वजाचा वापर टाळावा; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

नागरिकांनी प्लास्टिक, कागदी ध्वजाचा वापर टाळावा; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

googlenewsNext

ठाणे : जिल्ह्यात दरवर्षी २६ जानेवारी, १५ ऑगस्ट या राष्ट्रीय सणाच्या दिवशी त्याचप्रमाणे १ मे या महाराष्ट्र दिनी आणि इतर महत्वाच्या कार्यक्रमांच्या व क्रीडा आयोजनांच्या दिवशी लहान आकारातील कागदी व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास येते. शालेय विद्यार्थी, लहान मुले, व्यक्ती राष्ट्रभक्ती व उत्साहापोटी हे राष्ट्रध्वज विकत घेतात. परंतु हे ध्वज त्याच दिवशी सायंकाळी अथवा दुसऱ्या दिवशी इतरत्र टाकले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. यामुळे नागरिकांनी कागदी व प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरु नयेत, असे आवाहन ठाणेजिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.           

गृह विभागाच्या शासन निर्णयानुसार रस्त्यावर इतरत्र पडलेल्या, खराब झालेल्या व फाटलेल्या ध्वजांचे संकलन करुन राष्ट्रध्वज संहितेमध्ये नमूद कार्यपध्दतीनुसार नष्ट करण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपरिषदस्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यानुसार ग्रामपंचायत स्तरावर अध्यक्ष म्हणून ग्रामसेवक तर सदस्य म्हणून गावातील शाळांचे मुख्याध्यापक, गावातील पोलीस पाटील आहे. तर नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर अध्यक्षपदी मुख्याधिकारी, सदस्य- नगरातील शाळांचे मुख्याध्यापक, संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किंवा त्यांचा प्रतिनिधी याप्रमाणे समित्या स्थापन करुन त्या कार्यान्वित करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्याधिकारी, नगरपालिका यांना कळविण्यात आले आहे.

स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट रोजी साजरा हाेत असून या दिवशी व त्यानंतर कागदी व प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरु नयेत. राष्ट्रध्वज इतरत्र टाकू नयेत. राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा. सर्व नागरिक, सामाजिक संस्था, अशासकीय संस्था यासंदर्भात नेमण्यात आलेल्या शासकीय समित्या यांनीही इतरत्र पडलेले, खराब झालेले व फाटलेले राष्ट्रध्वज संकलित करावेत. कोणत्याही संस्थेने किंवा व्यक्तीने स्वतःहून गोळा केलेले राष्ट्रध्वज शासकीय समित्यांकडे द्यावेत. या समित्यांनी ते स्वीकारुन खराब व फाटलेल्या राष्ट्रध्वजांची विल्हेवाट ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नेमण्यात आलेल्या समित्यांनी करावी, असे आवाहनही शिनगारे यांनी केले आहे.

Web Title: Citizens should avoid using plastic and paper flags, District Collector appeals to thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.