लाकडी शिडी जोडून होतोय नागरिक - विद्यार्थ्यांचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 11:22 PM2019-08-08T23:22:09+5:302019-08-08T23:22:30+5:30
पावसात पूल गेला वाहून; जीवघेणा प्रवास
वाडा : वाडा - विक्र मगड या दोन जोडणारा पिंजाळी नदीवरील मलवाडा येथील पूल रविवारी झालेल्या महापुरात वाहून गेला. आता या ठिकाणी वाहने तर नाहीच, पण पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी रस्ताच राहिला नसल्याने मलवाडा, पीक परिसरातील विद्यार्थी, नागरिक अर्धवट तुटलेल्या पुलाला लाकडी शिडी बांधून जीवघेणा प्रवास करीत आहेत.
रविवारी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पिंजाळी नदीला महापूर आला. या महापुरात नदीवरील मलवाडा येथील पुलाचा एक भाग वाहून गेला आहे. त्यामुळे मलवाडा, वाकी, पोचाडे, पीक, पास्ते शिलोत्तर अशा १५ ते २० गावांचा संपर्क तुटला आहे. मलवाडा येथील माध्यमिक शाळेत पीक, पास्ते या गाव परिसरातून पन्नासहून अधिक विद्यार्थी ये-जा करीत होते. तसेच मलवाडा परिसरातील आठ ते दहा गावे ही विक्रमगड तालुक्यातील असली तरी येथील नागरिकांना जवळची आणि सोयीची मुख्य बाजारपेठ वाडा हीच आहे. त्याचप्रमाणे या परिसरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी वाडा महाविद्यालयात जातात. या विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना ये-जा करण्याची मोठी अडचण निर्माण झाल्याने मलवाडा येथील ग्रामस्थांनी दोन उंच लाकडी शिड्या एकमेकांना जोडून या तुटलेल्या पुलाला उभ्या केल्या आहेत. या धोकादायक शिडीवरुन येथील विद्यार्थी व नागरिक आपला जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत. शिडी तुटून अथवा शिडी कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लवकरच या ठिकाणी माती भराव करुन पादचारी व वाहने ये-जा करण्यासाठी रस्त्याचे काम हाती घेतले जाईल.
- चंद्रकांत पाटील, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाडा.
पाणी विसर्ग होण्याच्याच जागी या पुलाचा भाग माती भरावाचा असल्याने तो दुसऱ्यांदा तुटला आहे. आता या ठिकाणी माती भराव न करता आर.सी.सी. खांब उभारणी करु न त्यावर स्लॅब टाकून या पुलाचे काम करावे.
- चंद्रकांत पाटील, सरपंच, ग्रामपंचायत मलवाडा