भिवंडीत मेट्रोच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिक त्रस्त ; रस्ता रुंदीकरणाकडे मनपा प्रशासनानेही दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 05:26 PM2020-10-06T17:26:29+5:302020-10-06T17:27:02+5:30
मेट्रो प्रकल्प भिवंडी शहरातून अंजुरफाटा ,धामणकर नाका, कल्याण नाका मार्गे टेमघर, साईबाबा नाका मार्गे कल्याणच्या दिशेने जाणार आहे.
- नितिन पंडित
भिवंडी - ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो ५ प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन देखील करण्यात आले आहे . सध्या या मेट्रोप्रकल्पाच्या कामास सुरवात होऊन कशेळी पासून ते थेट भिवंडी शहरातील धामणकर नाका पर्यंत रस्त्यावर बॅरिकेट्स लावून कामास प्रत्येक्ष सुरवात देखील करण्यात आली आहे . मात्र हे काम करतांना मेट्रोप्रकल्पाच्या संबंधित ठेकेदार व जबादार अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शहरातील नागरिकांना बसत आहे . विशेष म्हणजे हा प्रकल्प सुरु झाला तरीही मेट्रो मार्गिकेमध्ये येणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने हातून कोंडीची समस्या निर्माण झाली आहे . त्यातच प्रकल्प ठेकेदार व अधिकाऱ्यांसह एमएमआरडीए व भिवंडी महानगरपालिका प्रशासनात काडीचीही सुसूत्रता दिसत नसल्याने हे काम नक्की पूर्णत्वास जाणार का किंवा कसे असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
मेट्रो प्रकल्प भिवंडी शहरातून अंजुरफाटा ,धामणकर नाका, कल्याण नाका मार्गे टेमघर, साईबाबा नाका मार्गे कल्याणच्या दिशेने जाणार असून या मार्गावरील अतिक्रमण हटविणे, रस्ते रुंदीकरण करण्या बाबत कोणतेही नियोजन महानगरपालिका प्रशासना कडून केले नसल्याने या मार्गा वरून मेट्रो जाणार कशी या बाबत नागरीकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच या मेट्रोच्या मार्गिकेत ठेकेदारांनी मोठ्या वजनाचे लोखंडी बॅरिकेट्स उभी केल्याने रस्ता अरुंद झाल्याने धामणकर नाका ते अंजुरफाटा या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असताना ठेकेदारांनी ठिकठिकाणी सुरक्षा रक्षक उभे करणे गरजेचे आहे मात्र तशी व्यवस्था अजूनही झालेली नसल्याने बॅरिकेट्स पडून एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे कल्याण रोड मार्गात कोणतेही नियोजन न केल्याने या मार्गावरील व्यावसायिक ,निवासी गाळेधारक रस्ता रुंदीकरणास विरोध करीत असताना त्यांचे समाधान आज पर्यंत झाले नसल्याने शहरात सुरू झालेले मेट्रो चे काम पुढे कसे नेणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे भविष्यात मेट्रोच्या या नियोजन शून्य कारभाराचा फटका शहरातील नागरिकांना बसणार असल्याने मेट्रो प्रकल्पातील संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे.