‘नागरिकत्व सुधारणा’ हा अल्पसंख्याकांवरील अन्याय दूर करणारा कायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 08:58 PM2019-12-25T20:58:07+5:302019-12-25T21:07:18+5:30
नागरिकत्व सुधारणा कायद्याचा काँग्रेसने खोटा प्रचार केला असून सीएएच्या समर्थनार्थ आता लोक उत्स्फूर्तपणे बाहेर येत असल्याचा दावा भाजपचे सहमुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी ठाण्यात केला. अन्याय दूर करणारा मानवतावादी कायदा असून त्याच्याशी भारतातील मुस्लिम किंवा अन्य कोणत्याही धर्माच्या नागरिकांचा संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : नागरिकत्व सुधारणा कायदा हा पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील धार्मिक अल्पसंख्याकांवरील देशाच्या फाळणीमुळे झालेला अन्याय दूर करणारा मानवतावादी कायदा असून त्याच्याशी भारतातील मुस्लिम किंवा अन्य कोणत्याही धर्माच्या नागरिकांचा संबंध नाही, असे स्पष्ट मत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी ठाण्यात व्यक्त केले. नागरिकत्व सुधारणा कायदा यासंदर्भात नागरिकांमध्ये असलेले गैरसमज याबाबत भूमिका मांडताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
ठाणे शहर भाजपच्या खोपट येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी भाजपाचे ठाणे शहराध्यक्ष अॅड. संदीप लेले आणि आमदार निरंजन डावखरे हेही उपस्थित होते.
नागरिकत्व सुधारणा कायद्याचा काँग्रेसने खोटा प्रचार केला असून सीएएच्या समर्थनार्थ आता लोक उत्स्फूर्तपणे बाहेर येत असल्याचा दावाही त्यांनी केला. काश्मीरसंदर्भातील कलम ३७० असो किंवा तिहेरी तलाक अथवा आताचा नागरिकत्व सुधारणा कायदा याला काँग्रेसने जातीय आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला. नागरिकत्व सुधारणा कायदा, २०१९ हा कोणताही नवीन कायदा नाही. तर नागरिकत्व कायदा, १९५५ यामध्ये सुधारणा आहे. या कायद्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशांतील हिंदू, जैन, बौद्ध, शीख, पारशी अथवा ख्रिश्चन समुदायांतील जे लोक धार्मिक छळामुळे ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात आले आणि देशात राहत आहेत, त्यांना नागरिकत्व मिळणार आहे. हा सुधारणा कायदा मुस्लिमांच्या विरोधात असल्याचाही अपप्रचार होत आहे. तो चुकीचा आहे.
* म्हणून पाकिस्तान, बांगलादेशचा समावेश नाही
या कायद्यामुळे संविधानातील समानतेच्या तत्त्वाचे उल्लंघन होत नाही. घटनेने अनेक बाबतीत विविध धर्मीयांसाठी विविध कायदे करण्याची परवानगी दिली आहे. मुळात भारताचे संविधान हे भारताच्या नागरिकांसाठी आहे. मुस्लिमधर्मीय असल्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक नाहीत. त्यामुळे त्यांचा या कायद्यात समावेश नसल्याचेही उपाध्ये यांनी स्पष्ट केले.
* अभिव्यक्ती स्वातंत्र्य गेले कुठे
केवळ मुख्यमंत्र्यांवर सोशल मिडियाच्या माध्यमातून टीका केली तर मुंबईतील एका रहिवाशाला शिवसैनिकांनी मारझोड करीत त्याचे मुंडनही केले. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते गेले कुठे? असा सवाल भाजपचे सह मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी ठाण्यात केला.
एरव्ही, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतांना त्यांच्यावर किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही सोशल मिडियाच्या माध्यमातून खालच्या पातळीवरील टीका झाली. त्यावेळी हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे सांगत, अशी टीका खपवली जात होती. मग आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल टीका होताच शिवसैनिकांनी अशी मारझोड का करावी? लोकांनी व्यक्त व्हायचेच नाही का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांचा सात बारा कोरा केला जाईल, असा दावा आधी करण्यात आला होता. मग आता फक्त दोन लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले ते अजूनही झालेले नाही. अमृता फडणवीस या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असल्या तरी त्या एक स्वतंत्र व्यक्ती आहेत. त्यांचे स्वतंत्र विचार आहेत. त्यांनी जर कोणावर टीका केली तर ती स्वीकारली पाहिजे,असे एका प्रश्नाला उत्तर देतांना ते म्हणाले. अॅक्सिस बँकेतील पोलिसांची खाती आता अन्य एका बँकेत वळती करण्यात येणार आहेत, या प्रश्नाला उत्तर देतांना ते म्हणाले, या बँकेत नियमाला धरुनच पोलिसांची खाती होती. हे याआधीही स्पष्ट झाले आहे. कोणी जर नियमापलिकडे जाऊन ती अन्यत्र वळती करणार असतील तर तो त्यांचा प्रश्न असल्याचा टोला त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लगावत अमृता फडणवीस यांची पाठराखण केली.