सिटी कमांड सेंटर ठरणार स्मार्ट सिटीतील कळीचा मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:42 AM2017-10-02T00:42:23+5:302017-10-02T00:42:30+5:30
दक्षिण कोरियाच्या स्मार्ट सिटीत पोलीस, आरोग्य, अग्निशमन दल सिटी कमांड सेंटरशी जोडलेले आहेत. या सेंटरद्वारे आपत्कालीन परिस्थितीत त्यांना निरोप मिळतो आणि त्यांचे काम सुरू होते.
मुरलीधर भवार
कल्याण : दक्षिण कोरियाच्या स्मार्ट सिटीत पोलीस, आरोग्य, अग्निशमन दल सिटी कमांड सेंटरशी जोडलेले आहेत. या सेंटरद्वारे आपत्कालीन परिस्थितीत त्यांना निरोप मिळतो आणि त्यांचे काम सुरू होते. कोरियन कंपनीच्या साह्याने कल्याण-डोंबिवलीही असे सिटी कमांड सेंटर उभे राहू शकते. त्याची पाहणी खुद्द महापौर राजेंद्र देवळेकर आणि विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी नुकतीच केली. कल्याण-डोंबिवली ही शहरे स्मार्ट करण्यात दक्षिण कोरियाने रस दाखवला असून तब्बल दोन हजार कोटींच्या गुंतवणुकीची तयारी दाखवली आहे.
शहर स्मार्ट होणार म्हणजे नेमके काय याची माहिती घेण्यासाठी, तसेच पालिकेने सापर्डे येथे ठरवलेले स्मार्ट शहर कसे असू शकेल याचे चित्र पाहण्यासाठी त्यांचा हा दौरा महत्त्वाचा होता. सापर्डे येथे ७५० एकर जागेवर स्मार्ट सिटी प्रकल्प उभा राहणार आहे.
कल्याण-डोंबिवलीची स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झाल्यावर दक्षिण कोरियातील कंपनीशी एप्रिल महिन्यात सामंजस्य करार झाला. त्यानंतर तेथील विकास प्रदर्शनाला भेट देण्यासाठी महापौर राजेंद्र देवळेकर आणि विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी दौरा केला. त्या स्मार्ट सिटीतील काही प्रकल्प कल्याण-डोंबिवलीत उभारणे शक्य असल्याचे मत त्यांनी मांडले. कोरियात ३२ चौरस कि. मी. च्या परिसरात स्मार्ट सिटी उभारण्याचे काम सुरु आहे. त्यापैकी नऊ चौरस कि. मी. च्या परिसरात पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. तेथे बस स्टॉपवर उभे राहिल्यावर किती वेळात बस येईल, याची माहिती व्हॉटस्अॅपवर दिली जाते. त्या क्षणी ती बस कोणत्या स्टॉपवर आहे. तिला किती वेळ लागेल, याची माहिती मिळते, असे उदाहरण देवळेकर यांनी दिले. गरीब व उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी या स्मार्ट सिटीत घरे आहेत. ती भाड्याने, विकतही घेता येऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते हळबे यांनीही सिटी कमांड सेंटरबद्दल चांगले मत मांडले. त्यामुळे आपत्त्कालीन व्यवस्थापन चांगले होऊ शकते. आपल्याकडे नागरीकरण वाढल्यावर विकासाचा विचार केला जातो. कोेरियात हेच चित्र उलट्या स्वरुपात पाहावयास मिळते. आधी पायाभूत सुविधांचे जाळे विणून झाल्यावर नंतर शहरविकास व इमारत बांधण्याचे काम हाती घेतले जाते. त्यांनी ३२ चौरस किलोमीटर क्षेत्रात स्मार्ट सिटीचे काम सुरु केले आहे. त्यापैकी नऊ चौरस कि. मी. मध्ये काम पूर्ण झाले. त्याच धर्तीवर आपल्याकडे सापर्डे शहर विकसित करता येऊ शकते, असे त्यांनी सुचवले.
सध्याची स्थिती काय?
स्मार्ट सिटीत कल्याण-डोंबिवलीची निवड आॅगस्ट २०१६ ला झाली. पण गेल्या वर्षांत पाचच बैठका झाल्या. त्यावर एमएमआरडीएचे नियंत्रण आहे. केंद्र व राज्य सरकारकडून पालिकेस दोन टप्प्यात निधी आला. स्मार्ट सिटीचा आराखडा तयार करताना पालिकेने एरिया बेस व पॅन सिटी अशा दोन भागात दोन हजार ३०० कोटींचा आराखडा तयार केला. त्यात २८ प्रकल्प आहेत. साडेतीन वर्षात ते उभारायचे आहेत. पण त्यातील एकही सुरू झालेला नाही. या प्रकल्पांत स्थानिक अधिकाºयांना रस नाही.