शहर काँग्रेस कामचुकार पदाधिकाऱ्यांवर उगारणार शिस्तीचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:27 AM2021-06-17T04:27:26+5:302021-06-17T04:27:26+5:30
ठाणे : आगामी ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष वाढविण्याच्या दृष्टिकोनातून शहर काँग्रेसने ठोस पावले उचलण्यास सुरुवात ...
ठाणे : आगामी ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष वाढविण्याच्या दृष्टिकोनातून शहर काँग्रेसने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने पक्ष वाढविण्याबरोबर जे पदाधिकारी या कामात कामचुकारपणा करतील किंवा केवळ वरिष्ठांकडे हुजरेगिरी करून ठाण्यात पक्ष बांधणीसाठी वेळ देणार नाहीत, अशांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती शहर काँग्रेसने दिली.
निष्क्रिय कार्यकर्ते, पदाधिकारी, पक्षाला वेळ न देणारे कार्यकर्ते, शिस्तीचे पालन न करणाऱ्या कार्यकर्त्यांवर शिस्तीचा बडगा उगारला जाणार असून, त्यांचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे सादर केला जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण यांनी दिली आहे.
काँग्रेसने आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्धार केला आहे. त्या अनुषंगाने ठाण्यातही शहर काँग्रेसने स्वबळाची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार आता पक्ष वाढविण्यासाठी, शहराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले विषय हाताळून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पावले उचलली आहेत, तसेच प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्यावर त्या अनुषंगाने जबाबदारी देण्यास सुरुवात झाली आहे. आगामी निवडणुका आता नऊ महिन्यांवर आल्या आहेत. सध्या पक्षाचे तीन नगरसेवक जरी असले तरी त्यात जास्तीची वाढ कशी करता येईल, या अनुषंगाने सध्या व्यूहरचना आखली जात आहे; परंतु पक्ष वाढविण्यासाठी आणि ग्राउंड लेव्हल काम करण्यात जे कार्यकर्ते, पदाधिकारी हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे माहिती शहर काँग्रेसने दिली आहे.
.........
पक्ष संघटना वाढविण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलले आहे. पक्षाला शिस्त लावली जावी, प्रत्येक पदाधिकाऱ्याने मैदानात उतरून काम करावे, याच उद्देशाने हे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसारच जे कामचुकार पदाधिकारी असतील त्यांचा अहवाल दोन दिवसांत पक्षश्रेष्ठींकडे सादर केला जाणार आहे.
(ॲड. विक्रांत चव्हाण, शहराध्यक्ष, काँग्रेस, ठाणे)