उल्हासनगर चेटीचंड यात्रे निमित्त सजले शहर
By सदानंद नाईक | Published: April 6, 2024 04:32 PM2024-04-06T16:32:29+5:302024-04-06T16:33:11+5:30
उल्हासनगरात बहुसंख्याने सिंधी समाज राहत असून सिंधी समाजातील सर्वात मोठा सण चेटीचंड आहे.
उल्हासनगर : सिंधी समाजाच्या पवित्र चेटीचंड निमित्त शहरातून भव्य शोभायात्रेचे आयोजन केले असून यात्रेत सिंधी समाजाची सांस्कृतिक झलक दिसणार आहे. त्यापूर्वी ९ एप्रिल रोजी संपूर्ण शहरातून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
उल्हासनगरात बहुसंख्याने सिंधी समाज राहत असून सिंधी समाजातील सर्वात मोठा सण चेटीचंड आहे. सिंधी समाजाचे दैवत साई झुलेलाल यांचा चेटीचंड हा अवतरण दिवस असून त्यानिमित्त संपूर्ण शहरातून दरवर्षी महायात्रा काढण्यात येते. चेटीचंड महायात्रा १० एप्रिल रोजी संपूर्ण शहरातून निघणार असून महायात्रेत हजारो सिंधी बांधव मोठ्या उत्सवाने सहभागी होणार आहेत. तसेच देव शंकर, विष्णू, संत झुलेलाल, हनुमान, राम, कृष्ण आदी देवदेवतांचे रथ सजविण्यात येणार आहे. १० एप्रिल रोजी पवित्र चेटीचंड असून त्यानिमित्ताने महायात्रेचे आयोजन केले. त्यापूर्वी ९ एप्रिल रोजी भव्य बाईक रॅलीचे आयोजन केल्याची माहिती यात्रा संयोजकांनी दिली. शहर पश्चिमेतील झुलेलाल मंदिरापासून महायात्रा व बाईक रॅलीला सुरवात होणार आहे. तर स्वामी शांतीप्रकाश आश्रम येथे महायात्रा व रॅली संपन्न होणार आहे.
शहरातून निघणाऱ्या चेटीचंड यात्रे निमित्त चौक, मार्केट, रस्ते रोषणाईने उजळणार असून रोषणाईने काम युद्धपातळीवर सुरू आहे. यात्रेचे प्रत्येक चौकात स्वागत करण्यात येते. यात्रेत सिंधी समाजसह अन्य समाजही सहभागी होत असून विविध पक्षाचे राजकीय नेते यात्रेत सहभागी होऊन एकतेचा संदेश देतात. यात्रेत हिंदू धर्मातील देवदेवतांचे रथ सजविले जात असून सिंधी सांस्कृतीची झलक यानिमित्ताने शहरवासीयांना अनुभवास मिळते. यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना जेवण, नाष्टा, पाणी, थंड पेय आदींची सुविधा यात्रे महोत्सव समितीकडून केली जाते.