नगरविकास विभागाने छाटले सिडकोचे पंख! नैनाचे क्षेत्र झाले कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 05:47 AM2019-09-29T05:47:39+5:302019-09-29T05:48:50+5:30
नगरविकास विभागाने अखेर नैना अधिसूचित क्षेत्रात मोडणाऱ्या खालापूर तालुक्यातील ३० गावांच्या नियोजनाचे सिडकोकडील अधिकार काढून ते आधी ठरल्यानुसार रस्तेविकास महामंडळाने सुुपुर्द केले आहेत
- नारायण जाधव
ठाणे : नगरविकास विभागाने अखेर नैना अधिसूचित क्षेत्रात मोडणाऱ्या खालापूर तालुक्यातील ३० गावांच्या नियोजनाचे सिडकोकडील अधिकार काढून ते आधी ठरल्यानुसार रस्तेविकास महामंडळाने सुुपुर्द केले आहेत, तर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ-कुळगाव-बदलापूर अधिसूचित क्षेत्रातील पूर्वी नवी मुंबई पालिकेच्या कार्यक्षेत्रातून वगळलेल्या १४ गावांच्या नियोजनाचे अधिकार सिडकोकडून एमएमआरडीएकडे सोपविले आहेत.
मुंबई-पुणे एक्स्पे्रस वेच्या दोन्ही बाजूंकडील २ किमी परिघातील नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्रात मोडणाºया खालापूर तालुक्यातील ३० गावांचे नियोजन प्राधिकरण म्हणून रस्ते विकास महामंडळाची यापूर्वीच १७ फेबु्रवारी, २०१६ची नियुक्ती केली होती. मात्र, त्याच्या नियोजन प्राधिकरणाबाबतची अधिसूचना काढलेली नव्हती, परंतु आता नैनाच्या दुसºया टप्प्यातील विकास योजनेस गेल्या आठवड्यात मंजुरी दिल्यानंतर, नगरविकास विभागाने खालापूर तालुक्यातील त्या ३० गावांचे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून रस्ते विकास महामंडळाची नियुक्ती करण्याची अधिसूचना अखेर १९ सप्टेंबर रोजी काढली आहे.
‘त्या’ १४ गावांचा फुटबॉल
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ-कुळगाव-बदलापूर अधिसूचित क्षेत्रातील ठाणे शहराला लागून असलेल्या १४ गावांचा समावेश यापूर्वी एमएमआरडीएकडून १९९२ साली नवी मुंबई महापालिकेत करण्यात आला होता. त्या ठिकाणी नवी मुंबई महापालिकेने आरोग्य रुग्णालयासह स्मशानभूमी, रस्ते, परिवहनसेवेसारख्या सुविधा पुरविल्या. येथून दोन नगरसेवकही महापालिकेत निवडून आले होते. मात्र, स्थानिकांच्या विरोधामुळे ही गावे वगळण्यात आली. मात्र, नंतर ती पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केली, परंतु पुन्हा वगळली. त्यानंतर कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील २७ गावे आणि १४ गावे मिळून स्वतंत्र महापालिकेची मागणी होऊ लागली. मात्र, नैनाच्या अधिसूचनेनंतर या गावांचा कारभार सिडकोकडे देण्यात आला, परंतु आता पुन्हा नियोजनाचे अधिकार एमएमआरडीएकडे दिले आहेत.
३० गावे एमएसआरडीसीकडे
नैनातील ज्या ३० गावांचे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून रस्ते विकास महामंडळाकडे कारभार सोपविण्यात आला आहे, त्या ३० गावांमध्ये पराडे, मोरबे, नादोडे, नवांधे, निगडोली, पाली बुद्रुक, विनेगाव, भिलवळे, घोडीवली, कलोते-मोकाशी, कलोते-रायती, कन्ड्रोलीतर्फे वनखळ, अंजरुण, बोरगाव बुद्रुक, पडघे, वावरले, सोंडेवाडी, वरोसेतर्फे वनखळ, नानिवली, वडविहीर, बोरगांव खुर्द, शेनगाव, डोलिवली, मानकिवली, तिघर, नांगुर्ले, वळणे, आवरस, पळसदरी, तळवली यांचा समावेश आहे.