मुरबाड शहरामध्ये टपऱ्या केल्या जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:09 AM2019-06-05T00:09:54+5:302019-06-05T00:10:11+5:30
नगर पंचायतीची कारवाई : बेकायदा गाळ्यांना अभय का? लहान व्यावसायिक आले रस्त्यावर
मुरबाड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच मुरबाडमध्ये येणार असून त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण होणार आहे. त्याचप्रमाणे नवीन पोलिस वसाहत, पोलीस ठाण्याची इमारत तसेच नगर पंचायतीने बांधलेल्या खुल्या नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा होणार आहे . या पार्श्वभूमीवर वाहतुकीला अडथळा ठरणारी बेकायदा बांधकामे मंगळवारी नगर पंचायतीने पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केली.
कारवाईने हातावर पोट असणारे लहान व्यावसायिक उघड्यावर आले आहेत. एकीकडे नगर पंचायतीकडून लहान टपऱ्यांवर कारवाई केली जाते, परंतु मोठ्या व्यावसायिकांनी बांधलेला बेकायदा बांधकामांवर आजपर्यंत कोणतीच कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुरबाड नगर पंचायत हद्दीत बेकायदा बांधकामे झाली आहेत. यापैकी पालीस ठाण्याजवळ तीस ते चाळीस वर्षापासून असलेली पानाची टपरी, झुणकाभाकर केंद्र, शिवसेना कार्यालय,अन्य तीन ते चार टपºया होत्या. हुतात्मा स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता. मात्र आमदार किसन कथोरे यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीकोनातून या जागी शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याचा निर्णय घेऊन या ठिकाणाला लौकिक प्राप्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य शिवस्मारक व अश्वारुढ पुतळा बसवण्यात येणार आहे. पुतळ््याची विधीवत पूजा करून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्थापना करण्यात येणार आहे .
दहा दिवसात मुख्यमंत्री मुरबाड येथे येत असून स्मारक परिसरात असलेली बांधकामे काढून टाकण्याचा निर्णय नगर पंचायतीते घेतला. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात आठ टपºया हटवल्या. एकीकडे टपºया हटवल्या जात असताना तीनहात नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत तीन वर्षांपूर्वी बांधकाम केलेल्या बेकायदा गाळ्यांना मात्र नगर पंचायत अभय देत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दिव्यांग असलेले बुवा विशे यांची चाळीस वर्षापासून येथे पानाची टपरी होती. त्यांच्या टपरीवर कारवाई केल्याने त्यांच्या कुटुंबासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अतिक्रमण विभागाचे अधिकारी दत्ता डोहाळे यांनी सांगितले की, ज्यांच्या टपºया तोडल्या आहेत त्यांची पर्याय व्यवस्था करण्याबाबत कोणताही ठराव झालेला नाही. मात्र तसा विचार सुरू आहे.
नगर पंचायतीने गोरगरिबांच्या टपºया, शिवसेनेचे कार्यालय तोडले. मात्र अशीच कारवाई २३० बेकायदा गाळ््यांवर करावी. नगर पंचायतीने एकाला एक न्याय व दुसºयाला न्याय लावू नये. - रामभाऊ दुधाळे, शहरप्रमुख, शिवसेना