अंबरनाथमध्ये ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 11:57 PM2019-11-27T23:57:03+5:302019-11-27T23:57:19+5:30
अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी शहरातील नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे.
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी शहरातील नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी ‘नगराध्यक्ष आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याची सुरूवात शिवाजीनगर परिसरातून झाली. नागरिकांनीही आपल्या प्रभागातील समस्यांचा पाढा नगराध्यक्षांसमोर मांडला.
प्रभाग क्रमांक ५३ शिवाजीनगर परिसरातून या संकल्पनेची सुरूवात करण्यात आली. स्थानिक शिवसेना नगरसेविका रेश्मा गुडेकर यांच्या प्रभागातील नागरिकांसोबत संवाद साधण्यात आला. पालिकेचे अधिकारी व शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या समवेत नगराध्यक्षा वाळेकर यांनी नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या, सूचना व विचार जाणून घेतले.
वाळेकर यांनी या विभागातील गणपती मंदिर, मधली आळी, म्हाडा कॉलनी आदी परिसराची पाहाणी करून येथील रहिवाशांशी संवाद साधला. पालिकेचे उपमुख्याधिकारी व मुख्य स्वच्छता अधिकारी सुरेश पाटील, अभियंता राजेश तडवी, सुनील जाधव, नगरसेवक अॅड. निखिल वाळेकर, पद्माकर दिघे, उप शहर संघटक चंदा गान हे वाळेकर यांच्या समवेत होते.
शहरातील प्रत्येक नागरिकांना इच्छा असूनही पालिकेत येणे शक्य नसते. पालिकेत ज्यांना येणे अशक्य असते त्यांच्या अडचणी समजून घेता येतात. त्यांच्या अडचणी फार मोठया नसतात. मात्र त्यांना प्रत्यक्ष भेटल्याने नागरिकांना विशेष समाधान होते. त्यामुळे हा उपक्रम हाती घेतला आहे असे मत वाळेकर यांनी व्यक्त केले.