विठ्ठलनामाच्या गजराने ठाणे शहर दुमदुमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 02:49 AM2018-07-24T02:49:44+5:302018-07-24T02:50:02+5:30
मंदिरांत भाविकांच्या दर्शनासाठी रांगा; शाळांमध्ये निघाल्या दिंड्या अन् पालख्या
ठाणे : आषाढी एकादशी निमित्ताने सोमवारी शहरातील वातावरण विठ्ठलमय झाले होते. विठ्ठोबाच्या मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा होत्या तर दुसरीकडे काही शाळांत दिंड्या काढण्यात आल्या होत्या. काही संस्थांनी पूवर्संध्येला आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सर्वत्र पुंडलिका वरदा हरी विठ्ठल नामाचा गजर ऐकायला मिळत होता.
श्रीरंग एज्युकेशन सोसायटीच्या श्रीरंग विद्यालयाच्या मराठी - इंग्रजी माध्यमाच्या वतीने पारंपारिक दिंडी काढली. शाळेपासून सुरू झालेली ही दिंडी वृंदावन बस स्टॉप मार्गे वृंदावन सोसायटी येथील हनुमान मंदिर येथे जाऊन पुन्हा शाळेत विसर्जित झाली.
कोपरीतील मो. कृ. नाखवा हायस्कूल या शाळेतील माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांची दिंडी चेंदणी कोळीवाड्यातील श्री विठ्ठल मंदिरात दर्शनाला आली.
ब्राह्मण सेवा संघाच्या, महिला विभाग आयोजित रविवारी ‘संतसाहित्य’ या कार्यक्रमात महिलांनी संतसाहित्यावर आधारित विविध कलाविष्कार सादर केले. त्यामध्ये भारु ड, अभंग, भजन या साहित्यप्रकारांचा समावेश होता. कार्यक्र माच्या शेवटी प्रतिकात्मक दिंडी काढली होती. पारंपरिक दिंडीप्रमाणेच, या दिंडीमध्येही हाती भगव्या पताका आणि डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन, टाळांच्या साथीने, दिंडीतील महिलांनी फेर धरला होता.
दिंडी बाल कट्ट्याची, संस्कार रुजविण्याची
आषाढी एकादशीचे औचित्य साधून समतोल बाल संरक्षण समिती अंतर्गत येणाºया बालकट्ट्यावरील बालकांसाठी दिंडीचे आयोजन केले होते. मी रोज शाळेत जाईन, मी मोठ्यांचा आदर करेन, मी गुटखा खाणार नाही, मी शिवी देणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी रोज बाल कट्ट्यावर येईन, अशा विविध घोषणा मुलांनी दिल्या. तसेच तशा आशयाचे मुलांनी फलकदेखील हातात धरले होते.
दिंडीच्या माध्यमातून वस्तीतील मुलांवर विविध संस्कार, मूल्य शिक्षण करण्यासाठी उपक्र माच्या माध्यमातून बाल कट्टा नेहमीच सक्र ीय राहिला आहे. सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त संस्कार, मूल्य शिक्षणाचा ध्वज फडकविण्यात आला. दिंडीच्या वेळी वस्तीतील बाल कट्ट्यायावरील २७ मुले, बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य विजय जाधव बाल कट्टा प्रमुख सुरेखा साळवे, शिक्षिका अश्विनी भंडारे, स्नेहल मुळीक, समतोल कार्यकर्ते सुवर्णा घाडगे,आदींसह पालकांनी दिंडीत सहभाग घेतला होता.