अमोल मिटकरींच्या विरोधात सीकेपी ज्ञातीतर्फे आंदाेलन
By सुरेश लोखंडे | Updated: March 11, 2025 19:33 IST2025-03-11T19:32:44+5:302025-03-11T19:33:00+5:30
सीकेपी समाजातर्फे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारी तीव्र निदर्शने करण्यात आली.

अमोल मिटकरींच्या विरोधात सीकेपी ज्ञातीतर्फे आंदाेलन
लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : नाट्य कलाकारांचे आराध्य दैवत सुप्रसिध्द नाटककार राम गणेश गडकरी यांच्या संदर्भात बेताल वक्तव्य करणारे अजित पवार गटाचे आ. अमाेल मिटकरी यांच्या निषेधार्थ अखिल भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभु मध्यवर्ती संस्थेच्या नेतृत्वाखाली सीकेपी समाजातर्फे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारी तीव्र निदर्शने करण्यात आली.
येथील काेर्ट नाका, शासकीय विश्रामगृहासमाेर एकत्र आलेल्या या आंदाेलनकर्त्यांनी मिटकरी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. या आंदाेलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी विकास गजरे यांची भेट घेऊन त्यांना मिटकरी यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे दिले, अशी माहिती अखिल भारतीय चां. का. प्रभू मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष समीर गुप्ते यांनी दिली. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या, महाराष्ट्राच्या जडघडणीत योगदान देणाऱ्या, निष्ठा, बुद्धी आणि शौर्याचा वारसा जपणाऱ्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाच्या श्रद्धास्थानांवर केलेले हल्ले खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा निवेदनाव्दारे दिल्याचे गुप्ते यांनी स्पष्ट केले.