छातीत दुखल्याचा दावा करीत वकील पुत्र रुग्णालयात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 10:58 PM2018-12-10T22:58:49+5:302018-12-10T23:04:00+5:30
नौपाडा पोलिसांच्या अटकेनंतर न्यायालयीन कोठडी मिळालेल्या आदित्य फड या वकील पुत्राने छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने उपचाराची न्यायालयाने परवानगी दिली. त्याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ठाणे : सिग्नल तोडून वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबल अजित खैरमोडे यांच्या अंगावर गाडी नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य एकनाथ फड (१८) या कथित आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, आरोपीने आपल्या छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने त्याला न्यायालयाच्या परवानगीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ठाण्याच्या माजी जिल्हा सरकारी वकील संगीता फड तसेच खासगी वकील एकनाथ फड यांचा पुत्र आदित्यने ९ डिसेंबर रोजी दुपारी तीन हात नाका येथे बंदी असलेली काळी फिल्म लावलेल्या कारने येऊन आधी सिग्नल तोडला. नंतर लायसन्सची मागणी करणाºया वाहतूक पोलिसांनाच उर्मटपणे उत्तरे दिली. लायसन्सची मागणी करणाºया अजित खैरमोडे या पोलीस कॉन्स्टेबलवर त्याची कार नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार अडविणाºया हारुगले आणि थोरवे या पोलिसांवरही त्याने गाडी नेण्याचा प्रयत्न करुन तिथून पलायन केले होते. त्याला सायंकाळी धर्मवीरनगर येथून नौपाडा पोलिसांनी अटक केल्यानंतर सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्यावरील गंभीर आरोपामुळे त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे त्याची ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन बंदी म्हणून रवानगी होणार होती. मात्र त्याने आपल्या छातीत दुखत असल्याची तक्रार नौपाडा पोलिसांकडे केली. त्यानुसार वकील वडीलांच्या मदतीने त्याने न्यायालयात अर्ज करुन रुग्णालयात दाखल होण्यासाठी परवानगी मागगितली. न्यायालयाने त्याचा अर्ज मान्य केल्यानंतर नौपाडा पोलिसांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले..