काजूपाड्यात अनधिकृत बांधकाम वरून हाणामारी
By धीरज परब | Published: October 30, 2023 01:18 PM2023-10-30T13:18:50+5:302023-10-30T13:21:21+5:30
त्यातूनच अनधिकृत बांधकामावरून वाद विवाद होत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील घोडबंदर मार्गावर काजूपाडा ह्या इकोसेन्सेटिव्ह झोन मध्ये मोठ्या प्रमाणात पालिका अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने अनधिकृत बांधकामाचे साम्राज्य उभे राहिले असून बेकायदा बांधकामावरून आता जीवघेण्या हाणामाऱ्या होत आहेत .
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या कुशीत असलेल्या इको सेन्सेटिव्ह काजूपाडा ह्या मूळच्या आदिवासींच्या पाड्यात गेल्या काही वर्षां पासून भूमाफिया , व्यावसायिक आदींनी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल , बेकायदा भराव करून झोपडपट्ट्या व व्यावसायिक बांधकामे बेकायदेशीरपणे केली आहेत . परंतु महापालिकेसह वन व महसूल विभाग तसेच राजकारणी यांनी या कडे सातत्याने ठोस भूमिका न घेता दुर्लक्ष चालवले आहे .
त्यातूनच अनधिकृत बांधकामावरून वाद विवाद होत आहेत . रविवारी अश्याच जमीन व बेकायदा बांधकामावरून हाणामारी होऊन काशीमीरा पोलीस ठाण्यात एकमेकां विरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत . जीवाराम चौधरी ( ४८ ) यांच्या फिर्यादी नुसार काजूपाडा येथील त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणे ते असताना संजय गौंड हा आला व तू लोकांना जाण्यासाठी रस्ता कशाला देतो असे बोलला . त्याचा भाऊ संतोष सुद्धा तेथे आल्या नंतर दोघांनी शिवीगाळ सुरु केली . संतोष याने लोखंडी गज उचलून हातावर मारला त्यात हात फ्रॅक्चर केला . तर संजय याने लाकडी दांड्याने त्यांना मारहाण केली . त्यात ते जखमी झाले असल्याच्या फिर्यादी वरून पोलिसांनी संजय व संतोष गौंड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे .
दुसरीकडे संजय गौंड ( ३८ ) याच्या फिर्यादी वरून जीवाराम चौधरी ( ४८ ) वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . संजय यांच्या सर्वे क्र . ३९ / २ ह्या जागेवर चौधरी यांनी अतिक्रमण केले आहे . संजय व भाऊ संतोष याने चौधरी यांना त्या बाबत विचारणा केली असता त्यांनी ती माझी जागा असून तुम्हाला जे काय करायचे ते करा असे सांगत शिवीगाळ चालू केली. चौधरी याने आरडा ओरडा करत बांधकाम ठिकाणी पडलेल्या बांबूने संजय यांना मारले व संतोष ला शिवीगाळ , धक्काबुक्की केली असे फिर्यादीत म्हटले आहे .