जमिनीच्या वादातून दोन शेतकऱ्यांच्या गटात हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 07:21 PM2018-07-07T19:21:58+5:302018-07-07T19:23:06+5:30
पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल
कल्याण - कल्याण ग्रामीण परिसरातील द्वारली गावात जमिनीच्या वादातून दोन शेतकऱ्यांच्या गटात तुफान हाणामारी झाली असून याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कल्याणनजीक द्वारली गावातील जमिनीवरून गायकर आणि राऊत कुटुंबीयामध्ये वाद सुरु असून प्रमोद राऊत या शेतकऱ्याने विकासक संतोष डावखर यांना विकसित करण्यासाठी दिली आहे. मात्र, दुसरे शेतकरी सुदाम गायकर याने आपली जागा विकासकाकडून हडपण्याचा प्रयत्न करत असून यावरून दोघांमध्ये वाद सुरु झाला. दरम्यान, प्रमोद राऊत यांनी आपल्या जागेवर सरक्षक भिंतीचे काम सुरु असताना हि जागा दाखविण्यासाठी गेले असताना झालेल्या वादातून गायकर यांनी लोखंडी रॉडने राऊत यांच्या डोक्यात मारहाण केल्याची तक्रार पोलिसात दिली असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर सुदाम गायकर यांनी विकासक आपली जागा हडपण्याचा प्रयत्न करत असून याचा जाब विचारण्यासाठी गेले असता आपल्याला विकासक संतोष डावखर यांचे बाऊन्सर यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करत हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.