क्लासचा व्यवसाय जोरात, मात्र विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 12:05 AM2019-06-03T00:05:12+5:302019-06-03T00:05:28+5:30
शहरात किती खासगी क्लास चालतात याची केडीएमसी, मीरा-भाईंदर पालिकेकडे नोंदच नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. उद्या या ठिकाणी काही घडल्यास त्याची जबाबदारी कुणावर निश्चित करायची. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला काहीच महत्त्व नाही का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
मागील आठवडयात सूरतमधील कोचिंग क्लास सेंटरला आग लागल्याने त्यात अनेक विद्यार्थ्यांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर अन्य शहरांमधील प्रशासन यंत्रणांना जाग येऊन अग्निसुरक्षेची दक्षता न घेणाºया क्लासविरोधात कारवाई सुरू झाली असली तरी केडीएमसी प्रशासनाकडून मात्र तशी हालचाल प्रभावीपणे सुरू झालेली नाही. महत्त्वाचे म्हणजे आपल्या शहरात किती कोचिंग क्लास आहेत याची आकडेवारीच या महापालिकेकडे नाही. त्यामुळे सर्वेक्षण आणि त्यानंतर होणारी कारवाई कितपत सक्षमपणे होईल याबाबत मात्र शंका उपस्थित केल्या जात आहेत. एकीकडे केडीएमसीकडून अशा खाजगी क्लासच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले असताना जे कोचिंग क्लास चालवून बक्कळ पैसा कमवतात अशा छोटया-मोठया सर्वच संचालकांकडून आकारल्या जाणाºया फी आणि देण्यात येणाºया सुविधांमध्ये मोठी तफावत असल्याचेही दिसते. त्यामुळे ‘ व्यवसाय जोरात पण सुरक्षेचे तीनतेरा’ असे चित्र कल्याण डोंबिवलीतील बहुतांश कोचिंग क्लासमध्ये असल्याचे पाहायला मिळते.
केडीएमसी क्षेत्रात कोचिंग क्लासची संख्या हजारोंच्या आसपास आहे. पण याची अधिकृत आकडेवारी महापालिकेकडे नाही. सूरतमधील दुर्घटनेची पुनरावत्ती याठिकाणी होऊ नये म्हणून व्यापक मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यासाठी महापालिका हद्दीतील कोचिंग क्लासेसचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. आयुक्त गोविंद बोडके यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सूरत येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण करून कारवाईच्या सूचना दिल्या असल्यातरी अद्यापपर्यंत ठोस अंमलबजावणी सुरू झालेली नाही. शहरातील एकंदरीतच क्लासेसचा आढावा घेता काही अपवाद वगळता अनेक ठिकाणी सुविधांची बोंबाबोंब असल्याचे पाहायला मिळते. पहिले ते पाचवी, पाचवी ते दहावी,बारावी व अन्य स्पर्धा परीक्षांचे हजारो क्लास सद्यस्थितीला चालविले जात आहेत. एक हजारापासून आकारली जात असलेली फी आजच्याघडीला लाखाच्या आसपास पोहचली आहे. परंतु मोठया प्रमाणावर फी घेऊनही विद्यार्थ्यांसाठी पुरेशी सुरक्षितता आणि इतर सुविधा नाहीत हे वास्तव आहे. दोन्ही शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील व्यापारी संकुल, निवासी इमारती याठिकाणी क्लासचे जाळे विस्तारल्याचे पाहायला मिळते. कल्याणचा आढावा घेता स्थानक परिसर वगळता नव्याने वसलेल्या वस्त्यांमध्येही मोठया प्रमाणावर क्लास चालविले जातात.
स्थानक परिसरातील बोरगांवकरवाडी, शिवाजी चौक, सुधांशु चेंबर, मूलचंदानी शॉपिंग कॉम्प्लेक्स यांसह टिळकचौक, पारनाका, खडकपाडा, फ्लॉवर व्हॅली तर डोंबिवलीतील कस्तुरी प्लाझा, एव्हरेस्ट शॉपिंग सेंटर, पाटकर रोड आदी ठिकाणच्या व्यापारी आणि रहिवाशी संकुलांमध्ये क्लास तेजीत चालत आहेत. ही संकुल आकारमानाने मोठी असलीतरी त्यांची बांधकामे जुनी आहेत. त्यामुळे काही ठिकाणी जीर्ण तसेच धोकादायक झालेल्या बांधकामांचा मुद्दाही प्रकर्षाने जाणवत आहे. काही ठिकाणी कोंडवाडा भासावा अशी परिस्थिती असून वर्ग खोल्या सोयीस्कर नाहीत. येण्याजाण्याकरिता मोकळे जीने नाहीत हे देखील आहे. जागांमध्ये फेरबदल केल्याने मूळ बांधकामाला धक्काही काही ठिकाणी लागला आहे. त्यात विद्यार्थी संख्या मर्यादित नसणे, फायर सेफ्टी फायर एस्टिंग्युशर नसणे, पार्किंगची सुविधा नसणे असे चित्र काही मोठया क्लासचा अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी पाहायला मिळते. काही व्यापारी संकुलांमध्ये ज्याठिकाणी क्लास आहे त्याठिकाणी अन्य कार्यालयेही दाटीवाटीने आहेत हे कल्याणसह डोंबिवलीत सर्रास दिसून येते. महत्त्वाचे म्हणजे काहीठिकाणी तळमजल्याला हॉटेल आणि बारही आहेत. त्यात जुनी संकुल असल्याने असंख्य वायरींची गुंतागुंत असल्याने भविष्यात आगीसारख्या घटनांचा धोका याठिकाणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आम्ही खाजगी क्लासेसचे सर्वेक्षण करण्यास सुरूवात केली आहे. सरकारकडून काही निकष वा सूचना नसल्या तरी महापालिका अग्निशमन दल विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ते निकष ठरवून कार्यवाही करेल. शाळांसाठी असलेले निकष यासाठी विचारात घेतले आहेत. - प्रकाश बोराडे, प्रभारी, अग्निशमनदल प्रमुख
मीरा भाईंदरमध्ये सुमारे साडेतीनशे खाजगी क्लासेस चालतात. बहुतांश क्लास चालक हे स्वत: आग सुरक्षा आदींसाठीची उपाययोजना करतात. दोन वर्षांपूर्वी आम्ही मुंबई, ठाण्यातील चालकांचे आग सुरक्षा, आपत्कालिन स्थिती यावर कार्यशाळा घेतली होती. संघटनाही वेळोवेळी सूचना करत असते. - नरेंद्र बंभवानी, माजी पदाीधकारी, महाराष्ट्र क्लास ओनर असोसिएशन
सदनिका, गाळे आदी ज्या ज्या ठिकाणी खाजगी क्लास चालतात त्यांची नोंदणी करून घेण्यासह सुरक्षिततेसाठी शाळा आदींना लावले जाणारे निकष क्लासना लावले गेले पाहिजेत. अग्निसुरक्षा तसेच आपत्कालीन स्थितीबाबत उपाय योजणाऱ्यांनाच परवानगी द्यावी. त्या शिवाय चालणारे क्लासेस तातडीने बंद केले गेले पाहिजेत. - अॅड. रवी व्यास, सभापती, स्थायी समिती
कारवाईत सातत्य राहणार तरी कधी?
मुंबईतील अंधेरी येथे कामगार रूग्णालयातील आगीच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीच्या हद्दीतील सरकारी रूग्णालयांसह खाजगी रूग्णालयांचे फायर ऑडिट करण्याची मागणी शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी केली होती. अन्यत्र शहरांमध्ये सुरक्षेची काळजी न घेणाºया रूग्णालयांना सील ठोकण्याची कारवाई झाली पण शेट्टी यांनी केलेल्या मागणीची कितपत अंमलबजावणी झाली हा मात्र संशोधनाचा विषय आहे. दुसरीकडे कल्याण पश्चिमेतील बेतुरकरपाडा येथे २९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री झालेल्या गॅस सिलिंडर स्फोटात जगन आमले या अग्निशमन जवानाचा बळी गेला. एका चायनीज दुकानाला लागलेली आग विझवताना ही दुर्घटना घडली होती. या घटनेनंतर खुल्या जागी सिलिंडरचा वापर करणाºयांंविरोधात पालिकेने विशेष मोहीम उघडत सिलिंडर जप्तीची कारवाई सुरू केली होती. सूरत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण, डोंबिवलीत सर्वेक्षण होईल, नोटिसाही बजावल्या जातील, पण बेकायदा क्लास चालविणारे, सुरक्षा धाब्यावर बसवणाºयांवर कारवाईबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
मीरा भाईंदरमधील लहान मोठ्या सुमारे साडेतीनशे खाजगी क्लासेस मधील विदयार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे महापालिका प्रशासनाने आता पर्यंत दुर्लक्षच केले आहे. दाटीवटीच्या जुन्या, धोकादायक इमारतीं पासून दुकानांच्या गाळ्यात चालणाºया खाजगी क्लासेसच्या नोंदणी आणि आकडेवारीची माहितीही महापालिकेने ठेवलेली नाही. शाळां मध्ये जसे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंबंधी निकष, नियम आहेत त्या आधारे खाजगी क्लासेसनाही किमान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यास बंधनकारक करता आले असते. पण दुर्दैवाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत जेवढी उदासीनता महापालिका व लोकप्रतिनिधींनी दाखवली आहे त्यापेक्षा जास्त उदासीनता खाजगी क्लासेसमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांच्या बाबतीत दाखवण्यात आली हे वास्तव आहे. खाजगी क्लासेस आमच्या नियंत्रणात नाही असे सांगून महापालिका नेहमीच हात झटकत आली आहे. पण महासभेत मनाला वाटेल तसे परवाना शुल्क, धोरण व नियम - निकष ठरवताना प्रशासन व लोकप्रतिनिधींना खाजगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची आठवण झाली नाही. त्यामुळेच आज शहरात खाजगी क्लासेस वाटेल तिकडे सुरू केले जात आहेत. घराघरातून शिकवण्या घेतल्या जात आहेतच पण सदनिका, गाळे यातही खाजगी क्लासेस चालवले जात आहेत.
भाईंदर पूर्वेला रेल्वे स्थानकासमोर तसेच नवघर मार्ग, बाळाराम पाटील मार्ग, फाटक मार्ग, महात्मा फुले मार्ग येथील अनेक जुन्या आणि दाटीवाटीच्या इमारतींमध्ये मोठ्या संख्येने खाजगी क्लास चालवले जातात. भाईंदर पश्चिमेलाही शिवाजी महाराज मार्ग, डॉ. आंबेडकर मार्ग, दीडशे फूट , ९० फुटी मार्ग भागात जुन्या व नवीन इमारतींमध्ये खाजगी क्लासेस चालवले जातात. मीरा रोड पूर्वेला रेल्वे स्थानकासमोरील शांती शॉपिंग सेंटर , शांतीनगरपासून थेट काशिमीरापर्यंत तर कनकिया, हाटकेश आदी भागात क्लासेस चालतात. विद्यार्थ्यांकडून गलेलठ्ठ शुल्क घेणारे बहुतांश क्लासेस हे सदनिका, दुकानांच्या गाळ्यांमधूनच चालवले जातात. अरूंद जिने, दरवाजे, आत बसण्यासाठी अतिशय दाटीवाटीने केलेली आसन व्यवस्था, आपत्कालिन स्थिती झाल्यास विद्यार्थ्यांना बाहेर पडण्यासाठी नसलेले पर्यायी मार्ग, आग लागल्यास ती शमवण्यासाठी नसलेली अग्निशमन व्यवस्था आदी कोणत्याच उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत. मुलांच्या जिवीताचा विचार कधी पालिका व लोकप्रतिनिधींनीच केला नसल्याने अग्निशमन दलापासून परवाना विभाग, अतिक्रमण विभाग आदींनीही सतत कानाडोळा करण्यातच धन्यता मानली. सूरत येथील खाजगी क्लासेसला लागलेल्या आगीत तब्बल २२ विद्यार्थ्यांचा बळी गेल्यानंतरही महापालिका प्रशासनाने शहरातील खाजगी क्लासच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात सुरूवातीला गांभीर्य दाखवले नाही.