२५ नोव्हेंबरपासून क्लासेस सुरू करणार, कारवाई केल्यास 'जेल भरो' आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 03:49 PM2020-11-11T15:49:42+5:302020-11-11T15:50:26+5:30
Classes : आज कोचिंग क्लासेस संघटनेची राज्य कार्यकरणीची महत्वाची बैठक पार पडली.
ठाणे : अनलॉक मध्ये कोचिंग क्लासेस , शैक्षणिक संस्था वगळता दारूची दुकाने, बार, जिमखाने, ग्रंथालय, इतर सर्व गोष्टी सुरु झाल्या. परंतु शैक्षणिक क्षेत्राबद्दल शासनाकडे कोणतीही नीती, नियमावली व आराखडा नाही. मुळात सरकार याबाबतीत उदासीन असल्याचेच दिसते. त्यामुळे आज कोचिंग क्लासेस संघटनेची राज्य कार्यकरणीची महत्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत येत्या २३ तारखेला शाळा सुरु झाल्यानंतर २५ तारखेपासून महाराष्ट्रातील सर्व कोचिंग क्लासेस सुरु करणार असल्याचा ठराव करण्यात आला. तसेच, क्लासेस सुरु झाल्यानंतर जर कोणत्याही क्लासेसवर प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई, क्लासेस बंद करण्याच्या सूचना किंवा दंड आकारणी करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर कोचिंग क्लासेसच्या वतीने महाराष्ट्रभर 'जेल भरो' आंदोलन करण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला.
गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून राज्यातील सर्व कोचिंग क्लासेस बंद असल्याने क्लास संचालकाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहचा मोठा गंभीर प्रश्न निंर्माण झाला असून, क्लास संचालकास मोठ्या आर्थिक प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. शैक्षणिक क्षेत्राबद्दल शासनाकडे कोणतीही नीती नियमावली व आराखडा नाही. ज्या महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकर यासारख्या महामानवांनी जगाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले. त्या महाराष्ट्रात शिक्षणाचे असे हाल होत असतील तर ते महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
काही दिवसापूर्वीच २३ नोव्हेंबर पासून ९वी ते १२ वर्ग सुरु करण्याचे शासनाने सांगितले. परंतु खासगी क्लासेसबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही. संघटनेच्या आजच्या बैठकीत २५ तारखेपासून महाराष्ट्रातील सर्व कोचिंग क्लासेस सुरु करणार असल्याचे ठराव करण्यात आला. तसेच, क्लासेस सुरु झाल्यानंतर जर कोणत्याही क्लासेसवर प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केली तर महाराष्ट्रभर 'जेल भरो' आंदोलन करण्याचा ठराव देखील सादर बैठकीत करण्यात आला.