उल्हासनगरात सुका-ओला कचऱ्याचे वर्गीकरण वादात; मात्र २८ मेट्रिक टॅन ओला कचऱ्यावर प्रक्रियेचा महापालिकेचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2022 05:52 PM2022-04-25T17:52:51+5:302022-04-25T17:52:57+5:30
उल्हासनगरातून दररोज ३६० मॅट्रिक टॅन कचरा निघत असून त्याचे वर्गीकरण न करता थेट कचरा वाहणाऱ्या गाड्याच्या माध्यमातून थेट डम्पिंग ग्राऊंड मध्ये टाकला जातो.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरात सुका- ओला कचऱ्याचे वर्गीकरण वादात असतांना महापालिकेने २८ मेट्रिक टन ओला कचऱ्यावर प्रक्रिया करून खताची निर्माण करीत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी मनीष हिवरे यांनी दिली. ओला कचरा प्रक्रिया केंद्राची दुरावस्था झाली असून प्रक्रिया केंद्रात ओला कचरा टाकताच येत नसल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे.
उल्हासनगरातून दररोज ३६० मॅट्रिक टॅन कचरा निघत असून त्याचे वर्गीकरण न करता थेट कचरा वाहणाऱ्या गाड्याच्या माध्यमातून थेट डम्पिंग ग्राऊंड मध्ये टाकला जातो. कचऱ्यात प्लास्टिक पिशव्या आदींचा भरणा जास्त असल्याने, डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याच्या घटना सतत घडत आहेत. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्माण करण्यासाठी कचरा प्रक्रिया केंद्र महापालिकेने सुरू केले. हिराघाट, भाजी मार्केट, कॅम्प नं-३ दसरा मैदान, कॅम्प नं-५ मधील लालसाई उद्यान जवळ, वधारीया फौंडेशन आदी ठिकाणी ओला कचऱ्या प्रक्रिया करण्यासाठी केंद्र बांधण्यात आले. याठिकाणी कर्मचारीवर्ग भाजी मंडई व इतर ठिकाणचा ओला कचरा गोळा करून प्रक्रिया केली जाते. तसेच कंपोस्ट प्लास्टिक पिशवी बॅग मध्येही ओला कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.
शहरातून दररोज ३६० मॅट्रिक टन कचरा निघत असल्याचे गृहीत धरले जाते. त्यापैकी २८ मॅट्रिक टॅन ओला कचऱ्यावर प्रक्रिया करून खत बनविण्यात येते. अशी माहिती आरोग्य अधिकारी मनीष हिवरे यांनी दिली असलीतरी, शहरातून निघणाऱ्या कचऱ्याची मोजमाप होत नसताना, २८ मेट्रिक टन ओला कचऱ्यावर प्रक्रिया होते. हे कोणत्या अंदाजानुसार.,असा प्रश्न विचारला जात आहे.
घराघरातून गोळा करण्यात येत असलेला कचरा एकत्र उचलला जातो. कचऱ्याचे कोणतेही वर्गीकरण केले जात नसून ओला कचरा प्रक्रिया केंद्रात नावालाच केला जात असल्याचा आरोप होत आहे. तसेच प्रक्रिया केंद्राची दुरावस्था झाल्याचे चित्र आहे. महापालिका ओला कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी केलेला लाखो रुपयाचा खर्च पाण्यात जात असल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे.
खडी खदान डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ ?
महापालिकेचे राणा खदान डम्पिंग पाठोपाठ खडी खदान ओव्हरफ्लॉच्या मार्गावर आहे. तर उसाटणे येथील डम्पिंगचा तिढा सुटत नसल्याने, कचऱ्याच्या समस्यांची तलवार उभी ठाकली आहे. असे मत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर व्यक्त केले.