‘स्वच्छ डोंबिवली-स्वस्थ डोंबिवली’चा नारा
By admin | Published: April 7, 2016 01:15 AM2016-04-07T01:15:53+5:302016-04-07T01:15:53+5:30
‘अस्वच्छ शहर’ असा शहरावर लागलेला डाग पुसून काढण्यासाठी यंदाच्या स्वागतयात्रेत ‘स्वच्छ डोंबिवली-स्वस्थ डोंबिवली’चा नारा दिला जाणार आहे
जान्हवी मोर्ये, डोंबिवली
‘अस्वच्छ शहर’ असा शहरावर लागलेला डाग पुसून काढण्यासाठी यंदाच्या स्वागतयात्रेत ‘स्वच्छ डोंबिवली-स्वस्थ डोंबिवली’चा नारा दिला जाणार आहे. त्याचबरोबर, जलजागृतीसाठी सर्वत्र १० हजार पोस्टर्स लावली जाणार आहेत. नववर्ष स्वागतयात्रेचा उत्साह जपताजपता सामाजिक संदेश देण्याची परंपरा कायम राखली जाईल, अशी भावना यात्रेच्या संयोजिका दीपाली काळे यांनी व्यक्त केली.
भजन दिंडीच्या निमित्ताने यंदा महिलांचा लक्षणीय सहभाग वाढल्याचा, त्यातील पालखी लीलया पेलल्याचा सार्थ अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आस्थेने केलेल्या चौकशीची आठवण सांगत पर्यावरण वाचवण्याबाबत आणि ‘बेटी बचाव’वर सुरू असलेले काम यात्रेतून पोहोचवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डोंबिवलीत सध्या रस्ते विकासाची कामे सुरू आहे. त्यानुसार, स्वागतयात्रेचा मार्ग ठरवावा लागतो. महापालिकेने ही कामे लवकर पूर्ण केल्यास सण, उत्सवाला अडथळा होणार नाही, असे सुचवतानाच वेगाने गाड्या चालवणाऱ्यांवर पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याकडून सुरू असलेल्या कारवाईबद्दल, त्यासाठी गणेश मंदिर संस्थानने घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
संस्थानने हाती घेतलेल्या ग्रंथालयाचे काम सुंदर झाले आहे. त्यातून, अत्याधुनिक ग्रंथालय उपलब्ध होणार आहे. याचा अभिमानाने उल्लेख करतानाच त्यांनी स्वागतयात्रा ही एकाच वेळी आध्यात्मिक आणि सामाजिक उद्देशाने निघते. त्यातून जनजागृती होते. समाजाला सोबत घेण्याची भावना मोठी आहे. ती यापुढेही कायम राहील, यावर भर दिला. देणं तरुणाईचं : स्वागतयात्रेच्या पहिल्या वर्षापासून तरुणाईचा समावेश आणि सहभाग मोठा आहे. तो दिवसेंदिवस वाढतो आहे. यंदाच्या वर्षी मांडलेल्या सेल्फीच्या संकल्पनेपासून तरुणाईच्या नवनवीन संकल्पनांचे त्यांनी कौतुक केले. तरुणाईच्या सक्रिय सहभागामुळे नववर्ष स्वागतयात्रा टॅक्नोसॅव्ही झाल्याचा गौरवपूर्ण उल्लेखही काळे यांनी केला. भित्तीचित्रे रंगवण्याची स्पर्धा ही कल्पनाही तरुणाईचीच आहे. शहराचे विद्रूपीकरण रोखण्याचा तो चांगला प्रयत्न आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.