स्वच्छ? नव्हे, अस्वच्छ, गलिच्छ स्थानके!

By admin | Published: October 3, 2016 03:38 AM2016-10-03T03:38:20+5:302016-10-03T03:38:20+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहिमेला सुरूवात केली.

Clean? No, stagnant, dirty stairs! | स्वच्छ? नव्हे, अस्वच्छ, गलिच्छ स्थानके!

स्वच्छ? नव्हे, अस्वच्छ, गलिच्छ स्थानके!

Next

- पंकज रोडेकर, ठाणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहिमेला सुरूवात केली. त्याला दोन वर्षे उलटली. रेल्वेनेही या मोहिमेत उत्साहात सहभाग घेतला. फोटो काढण्यापुरती स्वच्छता झाली. पण ठाणे, दिवा, कल्याणसारखी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबणारी स्थानके असोत की डोंबिवलीसारखे आदर्शच्या यादीतील स्टेशन असो अस्वच्छता सर्वत्र पाचवीला पुजलेली आहे. प्रवाशांनी केलेला कचरा, थुंकून केलेली घाण असो; त्यापेक्षाही रेल्वेच्या आशीर्वादाने सुरू असलेली अस्वच्छता मोठी आहे. फेरीवाले, विक्रेत्यांचा कचरा, स्टेशनमध्ये हातपाय पसरलेल्या उपाहारगृहांचे सांडपाणी, गलिच्छ स्वच्छतागृहांमुळे पसरणारी दुर्गंधी असे चित्र जागोजागी आहे. सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या कचऱ्याने आणलेली अवकळा जागोजाग दिसते. यातील अनेक स्थानकांत स्वच्छतेचे कंत्राट दिले आहे, तरीही ही बकाल अवस्था! पावसाळ््यात ठिकठिकाणी झालेला चिखल आणि कुजलेला कचरा, घोंगावणाऱ्या माश्या, रूळांमधून फिरणारे उंदीर, दिवसभर प्रवाशांना फोडून काढणारे डास, मोकाट कुत्री, कुठेही लोळणारे भिकारी, गर्दुल्ल्यांचा वावर याच वातावरणात स्टेशनवर तळल्या जाणाऱ्या पदार्थांचा धूर-फोडण्यांचा ठसकाही प्रवाशांना सहन करावा लागतो. छतावरून, पंख्यांतून पडणारी जळमटे, बसण्याच्या जागेवर गळणारे पाणी यामुळे स्थानकांना दिवसेंदिवस ओंगळ स्वरूप येते आहे. मग स्वच्छतेचा वसा गेला कुणीकडे? असा प्रश्न पडतो.
ठाणे-डोंबिवलीसारखी गर्दीची स्थानके, दिवा आणि कल्याण जंक्शन या प्रातनिधिक स्थानकांची पाहणी केल्यावर फलाटापासून ते अगदी पूल, रेल्वे मार्गात सर्वत्र चटकन नजरेत भरतात ते कचऱ्याचे ढीग. मग गेल्या दोन वर्षातील स्वच्छतेचे मिशन कुठे गेले, असा प्रश्न प्रवाशांना पडतो. भिकारी, गर्दुल्यांमुळे घाणीत अधिकच भर पडते. भटक्या कुत्र्यांचा वावर पूल, तिकीटघरात, फलाटावर असल्याने तेही घाण करतात. त्यामुळे या परिस्थितीला जितके रेल्वे प्रशासन जबाबदार आहे तितकेच प्रवासीही. कारण स्थानकावरील स्टॉलमधून खाद्यपदार्थ घेतल्यावर त्याचे कागद कचराकुंडीत न टाकता फलाट किंवा रेल्वेमार्गात भिरकावले जातात. अशाने स्वच्छतेबाबत कितीही प्रयत्न केले, तरी कमी पडतात.
ठाणे व कल्याण रेल्वे स्थानके प्रवाशांनी ओसंडून वाहत असतात. कल्याण, दिवा ही तर जंक्शन आहेत. पण येथे स्वच्छता म्हणून काहीही नजरेस पडत नाही. स्वच्छ भारत अभियानात सहभागी झालेले रेल्वे प्रशासन स्वच्छतेबाबत वारंवार घोषणा करत असते. स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करा, असे फलक लावले जातात. प्रत्यक्षात चित्र उलटे आहे. ठाणे, कल्याण आणि दिवा स्थानके ही अस्वच्छतेची आगारे झाली आहेत. येथील फलाट, स्वच्छतागृह, तिकीट घर, अगदी उपहारगृह, प्रतीक्षागृहे सर्वत्र कचरा पडलेला असतो. स्वच्छतागृहेही गलिच्छ असल्याने येथून ये-जा करताना प्रवाशांना नाकावर रुमाल ठेवल्याशिवाय जाताच येत नाही. लांब पल्ल्याच्या गाड्यांतील विष्ठा, सांडपाणी, स्वच्छतागृहातील घाण, उपाहारगृहांतील अन्न खाऊन हात दुण्यासाठी ट्रॅकचा केलेला वापर अशा विविध कारणांनी आणि फेरीवाल्यांनी फेकलेल्या कचऱ्याने रेल्वेमार्गात घाणीचे साम्राज्य असते. त्यामुळे गाडीची वाट पाहणे नकोसे होते.
>ठाणे किंवा कल्याण येथील अस्वच्छता पाहिल्यास केंद्र सरकारने हाती घेतलेली स्वच्छता मोहीम कागदावरच असल्याचे दिसते. स्थानक सोडा, गाड्यांमध्येही अस्वच्छता आहे. अभिनेत्री निवेदिता सराफ यांची बॅग प्रवासात उंदराने कुरतडली. यावरून किती अस्वच्छता असेल, याचा अंदाज येईल. त्यामुळे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घोषणा करण्यापेक्षा त्या प्रत्यक्षात आणाव्यात. स्टेशनमध्ये वायफायपेक्षा वाहतूक सुधारण्याकडे, स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.
- आनंद परांजपे, माजी खासदार.
>ठाण्याला ऐतिहासिक स्थानकाचा दर्जा मिळालेला आहे. तेव्हा याला साजेशी स्वच्छता असली पाहिजे. पण स्वच्छतेबाबत लक्ष दिले जात नाहीत. प्रशासन आणि प्रवासी संघटनांकडून जनजागृती हाती घेतली जाते. पण प्रशासनाकडून प्रत्यक्षात जनजागृती होताना दिसत नाही. तर प्रवाशांनीही स्वच्छतेबाबत स्वत: हून पुढाकार घेतला पाहिजे.
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संघटना.
>पोस्टर निव्वळ नावाला : दोन्ही स्थानकात किंवा स्थानकाला जोडलेल्या स्कायवॉकवर फेरीवाल्यांनी आपले हातपाय पसरले आहेत. एकीकडे बेकायदा फेरीवाले आणि भिकाऱ्यांना प्रवेश बंद असून कुणी आल्यास दोन हजाराचा दंड आकारु, अशी पोस्टर रेल्वे प्रशासनाने लावली आहेत. मात्र, त्याकडे खुद्द रेल्वेचेच लक्ष नसल्याने फेरीवाल्यांबरोबर भिकाऱ्यांसाठीही ही स्थानके नंदनवन झाली आहेत.
>वायफायने तरुणाईचा गोंगाट
वायफाय सेवा दिल्याने फुकट्या नेटकरांचा वावर स्थानकात वाढला आहे. यामध्ये प्रामुख्याने तरुणाई असल्याने त्यांचा कायम गोंगाट सुरु असतो.
>डोंबिवलीतही तिच स्थिती
डोंबिवली स्थानकात फलाट एकवर मुंबईच्या दिशेला आणि कल्याणच्या दिशेला सर्वाधिक घाण आढळते.
पूर्वेकडील मध्यभागी असलेले तिकीटघर ते कल्याणच्या दिशेला असलेला पूल येथील स्थिती खराब आहे. स्वच्छतागृहांचा अभाव हे रडगाणे कायमचे. फलाट पाचवरील स्वच्छतागृह असो की तीन-चारवरील कल्याणच्या दिशेचे स्वच्छतागृह असो तेथे नित्यनेमाने घाण पाहायला मिळते.
स्वच्छतागृहाचा अभाव इतका आहे की फलाट एकवरून कल्याणच्या दिशेने बाहेर पडताच स्वच्छतागृहासमोर लागलेल्या रांगा पाहायला मिळतात. कल्याणच्या दिशेला असलेल्या पुलाची रचना विचित्र आहे. त्यातच तेथे फेरीवाले जागा अडवून बसतात.
पूर्वेचे मध्यभागी असलेले तिकीटघरही अशाच फेरीवाल्यांच्या विळख्यात आहे. पण त्याकडे रेल्वेच्या सर्वच व्यवस्थांचे दुर्लक्ष पाहायला मिळते.

Web Title: Clean? No, stagnant, dirty stairs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.