सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन, केडीएमसीबाहेर ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 01:15 AM2019-01-22T01:15:45+5:302019-01-22T01:15:52+5:30
सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना व महात्मा गांधी सफाई कामगार संघटना यांनी कामबंद आंदोलन केले.
कल्याण : सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना व महात्मा गांधी सफाई कामगार संघटना यांनी कामबंद आंदोलन केले. यावेळी कामगारांनी केडीएमसी मुख्यालयासमोर ठिय्या दिला. संघटनांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यावर आयुक्त गोविंद बोडके यांनी काही मागण्यांना तत्त्वत: मान्यता दिली. मात्र, त्या आठ दिवसांत मान्य न झाल्यास पुन्हा कामबंद आंदोलन केले जाईल, अशा इशारा संघटनांनी दिला.
सफाई मजूर काँग्रेस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक, राजेंद्र अढांगळे, सुरजपाल चिंडालिया, प्रशांत गायकवाड, प्रभाकर घेंगड, तर, महात्मा गांधी सफाई कामगार संघटनेचे बाबूभाई जेठवा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
सफाई कामगार संघटनांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल महापालिका प्रशासनाने घेतली नव्हती. मात्र, कामगार आयुक्तांनी चर्चेसाठी संघटनांची बैठक १४, १७ आणि १९ जानेवारीला बोलावली होती. मात्र, या तारखांना महापालिकेचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे त्यांनी सोमवारी कामबंद आंदोलन केले. त्यावर प्रशासनाने म्हटले की, कामगार संघटनांच्या आंदोलनाच्या इशाºयावर ३० जानेवारीला चर्चा करू, असे सांगितले होते. मात्र, आंदोलन २१ जानेवारीला असताना चर्चा ३० जानेवारीला कशाच्या आधारे करणार, असा सवाल संघटनांनी केला.
दरम्यान, कामगारांनी दिलेल्या ठिय्यामध्ये महिलांची संख्या मोठी होती. जवळपास दोन हजारांपेक्षा जास्त कामगारांनी कामबंद आंदोलनात सहभाग घेतल्याचा दावा संघटनांनी केला.
>संघटनांच्या मागण्या
कंत्राटी सफाई कामगारांची भरती बंद करावी. ३५० वारसा हक्कांची प्रलंबित असलेली प्रकरणे मार्गी लावावी, २५ वर्षे सेवा झालेल्या सफाई कामगारांना महापालिकेने घर द्यावीत, अशा मागण्या संघटनांनी केल्या आहेत.