शिवजयंतीनिमित्त चंदेरी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:15 AM2021-02-21T05:15:20+5:302021-02-21T05:15:20+5:30
बदलापूर : शिवजयंतीनिमित्त बदलापूरजवळच्या चंदेरी किल्ल्यावर दुर्गप्रेमींनी स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी पर्यटक आणि मद्यपींनी टाकलेला कचरा उचलून किल्ला स्वच्छ ...
बदलापूर : शिवजयंतीनिमित्त बदलापूरजवळच्या चंदेरी किल्ल्यावर दुर्गप्रेमींनी स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी पर्यटक आणि मद्यपींनी टाकलेला कचरा उचलून किल्ला स्वच्छ करण्यात आला.
बदलापूर आणि वांगणीच्या मधोमध दोन सुळक्यांचा हा चंदेरी किल्ला असून, त्याची उंची २३०० फूट इतकी आहे. या किल्ल्यावर वर्षभर ट्रेकर्स, पर्यटक यांची वर्दळ असते. तर मद्यपीही या किल्ल्याजवळच्या परिसरात पार्ट्या करण्यासाठी येतात. शिवजयंतीनिमित्त बदलापूरच्या सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर्स या समूहाने किल्ल्याची स्वच्छता केली. यात चॉकलेट, बिस्कीट, वेफर्स यांची पाकिटे, पाण्याच्या आणि दारूच्या बाटल्या जमा करण्यात आल्या. तर मानवी साखळी तयार करून किल्ल्यावरील कुंडातला गाळही काढण्यात आला. या मोहिमेत सहा वर्षांपासून ते ५० वर्षांपर्यंतच्या दुर्गप्रेमींनी सहभाग घेतला असल्याची माहिती या समूहाचे समन्वयक भूषण पवार यांनी दिली.
शिवजयंतीनिमित्ताने गडकिल्ल्यांची स्वच्छता करून महाराजांना अनोखी मानवंदना देण्याचे काम करण्यात आले. अशाच प्रकारची मोहीम इतरांनीही राबविल्यास राज्यातील सर्व गड, किल्ले स्वच्छ होतील असा आशावाद पवार यांनी व्यक्त केला.
------------------------------फोटो आहेत----------------