अंतर्गत नाल्यांच्या सफाईला उल्हासनगरमध्ये सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 11:52 PM2021-03-09T23:52:06+5:302021-03-09T23:53:26+5:30
३५ डंपर निघाला कचरा : ‘वालधुनी’च्या स्वच्छतेची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील नालेसफाईला सुरुवात केली असून, एकट्या समतानगर एमजेपी ग्राउंडशेजारील नाल्यातून ३५ डंपर कचरा निघाल्याची माहिती नगरसेविका मीना सोंडे यांनी दिली, तर दुसरीकडे वालधुनी नदी स्वच्छतेच्या प्रतीक्षेत असल्याची प्रतिक्रिया उल्हास-वालधुनी नदी बिरादरीचे शशिकांत दायमा यांनी दिली.
उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यात नाले तुंबून पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात जाऊन जीवित व वित्तहानी होऊ नये, म्हणून शहरातील लहान-मोठ्या नाल्यांची सफाई दोन टप्प्यांत सुरू केली आहे. नालेसफाईचे कंत्राट दिले असून, गेल्या काही दिवसांपासून नालेसफाईला वेग आला आहे. प्रत्येक प्रभागात कंत्राटी कामगार नाल्याची सफाई करीत असून, नगरसेवक स्वतः उभे राहून कामावर लक्ष ठेवत आहेत. कॅम्प नं. ५ एमजेपी ग्राउंड येथील समतानगर, कैलासनगर येथील नाला प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, लाकडी वस्तू, दगड-मातीने तुंबला होता. नगरसेविका सोंडे यांनी नालेसफाईची मागणी केल्यावर, जेसीबीने नाल्याची सफाई केली. तब्बल ३५ डंपर कचरा नाल्यातून निघाल्याची माहिती त्यांनी दिली. शहरातील बहुतांश नाल्यांची हीच परिस्थिती असल्याची माहिती त्यांनी दिली.
शहरातील लहान-मोठ्या नाल्याची साफसफाई होत असताना वालधुनी नदीसह खेमानी व गुलशन नाल्याची सफाई कधी होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. वालधुनी नदीची सफाई वडोलगाव येथून थेट शांतीनगर, सी ब्लॉकपर्यंत करावी, अशी मागणी दायमा यांनी केली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी दुसऱ्या टप्प्यातील नाल्याची सफाई महापालिकेने सुरू करावी, असे दायमा यांनी सुचविले आहे. सफाईतून निघालेला कचरा थेट डम्पिंगवर टाकण्याची मागणी केली जात आहे. पावसाळ्याच्या तोंडावरही सफाई केली जाणार असल्याची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांनी दिली.
नदीच्या सफाईला प्राधान्य द्या
शहराच्या मधून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या साफसफाईला प्राधान्य द्या, अशी मागणी नगरसेवक गजानन शेळके यांनी केली आहे. नदी कचऱ्याने तुंबल्यास वडोलगाव, अशोक साम्राटनगर, संजय गांधीनगर, रेणुका सोसायटी, अवधनगर, हिराघाट, शांतीनगर आदी परिसराला पुराचा धोका असतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी यापूर्वी झाली असल्याचे शेळके यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नदीच्या साफसफाईला प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी केली आहे.