एमआयडीसीतील नाल्यांची ‘कामा’कडून सफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 12:20 AM2020-01-02T00:20:51+5:302020-01-02T00:21:01+5:30

रहिवाशांचा कचरा नाल्यात?; महापालिका, एमआयडीसीचे सहकार्य नसल्याची टीका

Cleaning of MIDC drains from 'work' | एमआयडीसीतील नाल्यांची ‘कामा’कडून सफाई

एमआयडीसीतील नाल्यांची ‘कामा’कडून सफाई

Next

डोंबिवली : एमआयडीसी परिसरातील सोनारपाडा ते टेम्पोनाका आणि आशापुरा मंदिर ते गोलमैदान परिसरातील नाल्यांची बुधवारी कारखानदारांच्या ‘कामा’ संघटनेतर्फे स्वच्छता करण्यात आली. या नाल्यांमध्ये नागरी वस्तीत गोळा केलेला कचरा टाकण्यात येत असून, नाल्याचा प्रवाह रोखला गेल्याने ही स्वच्छता करण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी सांगितले.

एमआयडीसी, केडीएमसीकडून नियमित स्वच्छता झाली पाहिजे. मात्र, त्यांच्याकडून मदत मिळत नाही. तसेच ते जबाबदारीही घेत नाहीत, अशी खंत सोनी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, अनेकदा महापालिकेची मलनि:सारण वाहने बिनदिक्कतपणे नाल्यात किंवा मोकळ्या जागेत रिती केली जातात. अनेकदा परिसरातील मांस-मटणविक्रेते त्यांच्याकडील कचरा, मांस व अन्य घाण भरदिवसा नाल्यात टाकतात. औद्योगिक विभागात प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा राष्ट्रीय हरित लवाद यासारख्या संस्थांचे वरिष्ठ उच्च अधिकारी पाहणीसाठी येतात, तेव्हा त्यांना फक्त येथील अस्वच्छता नजरेस पडते. अशा वेळी उद्योग, सीईटीपीला जबाबदार धरले जाते. त्यामुळे कामा संघटना या परिसरात खाजगी तत्त्वावर स्वच्छतेची कामे करून घेते. मग असे असेल तर आम्ही एमआयडीसी, केडीएमसीकडे सर्व्हिस चार्ज, मालमत्ताकर का द्यायचा? संबंधित यंत्रणांनी उघड्यावर वा नाल्यात कचरा टाकणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची गरज आहे. त्याचबरोबर डोंबिवली औद्योगिक क्षेत्राकडे केंद्र, राज्य शासन या भागाकडे दुर्लक्ष का करत आहे, असा सवालही त्यांनी केला.

कामा संघटनेने महापालिकेकडे लेखी तक्रार करावी. मी स्वत: लक्ष घालून नालेसफाई करून घेईन.
- विलास जोशी, सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी, केडीएमसी
एमआयडीसी परिसर २०१५ मध्ये महापालिकेत समाविष्ट झाला आहे. त्यामुळे या भागातील स्वच्छतेची जबाबदारी ही महापालिकेची आहे. येथील कर महापालिका वसूल करते. त्यामुळे त्यांनी त्यांची जबाबदारी पूर्ण करावी.
- संजय ननावरे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी

Web Title: Cleaning of MIDC drains from 'work'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.