पोस्ट कार्यालयाच्या परिसरात साफसफाई; कर्मचाऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 01:44 AM2019-12-13T01:44:48+5:302019-12-13T01:45:27+5:30
पोस्ट कार्यालयाच्या परिसरात पावसाळ्यात उगवलेले मोठ-मोठे गवत काढण्यात आलेले नव्हते.
डोंबिवली : एमआयडीसीतील पोस्ट कार्यालयाच्या आवारात वाढलेली झाडे-झुडुपे आणि गवत, याकडे दुर्लक्ष झाल्याने या परिसरात वाढलेला विषारी सापांचा वावर पाहता याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याचबरोबर कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी जनरल पोस्ट मास्तरांना पत्र पाठवून साफसफाई बरोबरच कार्यालयाच्या इमारतीची डागडुजीही करण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे साफसफाई करण्यात आली असून, परिसर मोकळा झाल्याने येथील कर्मचाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
पोस्ट कार्यालयाच्या परिसरात पावसाळ्यात उगवलेले मोठ-मोठे गवत काढण्यात आलेले नव्हते. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने या परिसरात विषारी सापांचा वावरही वाढला होता. हे साप कार्यालयातही शिरकाव करायला लागल्याने तेथील कर्मचाºयांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. पोस्ट कार्यालयाच्या बाजूच्या भूखंडावर व रस्त्याच्या कडेला कचºयाचे ढीग जमा होत असल्याने येथे उंदीर, घुशींचा संचारही वाढला होता. पोस्ट कार्यालयाच्या आवारातील सध्याच्या परिस्थितीबाबत डोंबिवली वेलफेअर असोसिएशनतर्फे पोस्टाचे वरिष्ठ अधिकारी व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात आली होती.
दरम्यान, यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच आमदार प्रमोद पाटील यांनी मुंबईतील जनरल पोस्ट कार्यालयास पत्र पाठवले होते. डोंबिवलीतील पोस्ट कार्यालयाची वस्तूस्थिती त्यांनी पोस्ट मास्तरांच्या निदर्शनास आणून दिली होती. डोंबिवली पोस्ट कार्यालयाचा आवार स्वच्छ करण्याबरोबरच या इमारतीची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. दरम्यान, याची दखल घेत पोस्ट विभागाने एमआयडीसी कार्यालय परिसर गवत, झुडुपांपासून मुक्त केला.