कोविड रुग्णालयातील सफाई कर्मचारी वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:36 AM2021-04-14T04:36:41+5:302021-04-14T04:36:41+5:30
कल्याण: केडीएमसीच्या कोविड रुग्णालयात सफाई कामगारांच्या सुरक्षेबाबत तसेच त्यांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधांकडे कंत्राटदार कंपनीने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप ...
कल्याण: केडीएमसीच्या कोविड रुग्णालयात सफाई कामगारांच्या सुरक्षेबाबत तसेच त्यांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधांकडे कंत्राटदार कंपनीने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप संबंधित कामगारांनी केला आहे. कंत्राटदाराकडून पिळवणूक सुरू असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले असून याबाबत मनपा आयुक्त आणि सहाय्यक कामगार आयुक्तांकडे तक्रार करून न्याय देण्याची मागणी केली आहे.
केडीएमसीच्या टाटा आमंत्रा, लाल चौकी आर्ट गॅलरी, जिमखाना यासह अन्य एका कोविड रुग्णालयातील साफसफाईचे कंत्राट शार्प सर्व्हिसेस मुंबई या कंपनीला दिले आहे. या कंपनीचे १५० कामगार या रुग्णालयांमध्ये सफाईचे काम करीत आहेत. त्यांना वेळेवर व योग्य मोबदला दिला जाईल. समान वेतन कायद्यानुसार किमान वेतन अदा केले जाईल, कामगारांची नियमित वैद्यकीय चाचणी केली जाईल, साप्ताहिक सुटी प्रत्येक कामगाराला मिळेल, विमा काढला जाईल, असे आश्वासन कामावर ठेवताना संबंधित कामगारांना दिले होते. परंतु, यातील एकही आश्वासन पाळले गेलेले नाही, असे कामगारांचे म्हणणे आहे. यामुळे कामगारांचे आरोग्यही धोक्यात आले असून कामगारांनी त्याकडे लक्ष वेधले असता कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. आम्हाला किमान वेतन १२ हजार रुपये प्रतिमहिना, पीपीई किट, हातमोजे, सॅनिटायझर देण्यात यावे, कामगारांचा विमा काढावा. या आमच्या मागण्या असून जर त्या मान्य नाही झाल्या तर संपाचे हत्यार उपसले जाईल, त्याला सर्वस्वी कंत्राट कंपनी जबाबदार राहील, संबंधित कंपनीचे कंत्राट रद्द करून दुसरा कंत्राटदार नेमावा, अशी मागणी सफाई कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त, मनपा आयुक्त, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
------------------------------------------------------