ठाण्यात अल्पवयीन रुग्ण तरुणीचा विनयभंग करणाऱ्या सफाई कामगाराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 10:17 PM2018-12-25T22:17:02+5:302018-12-25T22:28:54+5:30
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करणा-या दिनेश कोळी या सफाई कामगाराला कळवा पोलिसांनी अटक केली. या घटनेने रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ठाणे: कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १४ वर्षीय तरुणीचा विनयभंग करणा-या दिनेश कोळी (३९, रा. कोळीवाडा, ठाणे) या सफाई कामगाराला कळवा पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
कल्याणच्या अंबिवली भागात राहणा-या या पीडित मुलीला तिच्या कुटुंबीयांनी २१ डिसेंबर रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास कळव्यातील या रुग्णालयात दाखल केले होते. तिला अचानक फिट येत असल्यामुळे तिच्यावर उपचार सुरु होते. तिच्या हाताचे सलाईन सुटू नये म्हणून तिचा एक हात बांधलेल्या अवस्थेत होता. याचाच गैरफायदा घेत २२ डिसेंबर रोजी उत्तररात्री एक वाजताच्या सुमारास दिनेशने तिच्याशी चाळे करीत तिचा विनयभंग केला. हा प्रकार त्या वार्डामधील एका महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने त्याला जाबही विचारला. तेव्हा त्याने उलट याच महिलेला ‘तुम तुम्हारा देखो’, असे बजावले. त्यानंतर या महिलेने आणि मुलीच्या आईने आरडाओरडा केल्यानंतर त्याने तिथून पळ काढला. नंतर सुरक्षा रक्षकाच्या मदतीने दिनेशला पकडण्यात आले. तेव्हा काही रुग्णांच्या नातेवाईकांनी त्याला चोप देऊन कळवा पोलिसांच्या स्वाधीन केले. २२ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने कोळी विरुद्ध तक्रार दाखल केली. कळवा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
.................