सफाई कामगारांना किमान वेतन मिळाले
By admin | Published: March 23, 2016 02:01 AM2016-03-23T02:01:45+5:302016-03-23T02:01:45+5:30
श्रमजीवी संघटनेने मंगळवारी काढलेल्या मोर्चानंतर वसई विरार महानगरपालिकेतील ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यास सुरुवात केली असून बँकेत पैसे जमा झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंद मागे घेतला
विरार : श्रमजीवी संघटनेने मंगळवारी काढलेल्या मोर्चानंतर वसई विरार महानगरपालिकेतील ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यास सुरुवात केली असून बँकेत पैसे जमा झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंद मागे घेतला.
राज्य सरकारने २४ फेब्रुवारी २०१५ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार पालिकेतील कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळाले पाहिजे यामागणीसाठी श्रमजीवी संघटनेने गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन सुुरु केले होते. पालिकेच्या गेल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत किमान वेतन देण्यासंबंधीच्या खर्चाला मंजूरीही मिळाली होती. मात्र, किमान वेतन बँकेत जमा करावे, अशी भूमिका श्रमजीवी संघटनेने घेतली होती. त्यासाठी आज सकाळी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो कामगारांनी पालिकेच्या विरार येथील मुख्यालयावर मोर्चा नेऊन पैसे बँकेत जमा होत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरु केले होते.
याची दखल घेत आयुक्त सतीश लोखंडे यांनी ठेकेदारांना कामगारांचे पैसे बँकेत ताबडतोब जमा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आठ ठेकेदारांनी दुपारपर्यंत बँकेत पैसे मजा केले. त्यानंतर कामगारांनी काम बंद आंदोलन मागे घेतले.
या निर्णयाचा ठेका पद्धतीवर काम करीत असलेल्या सुमारे चार हजारांहून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना होणार आहे. यात सफाई कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. किमान वेतन लागू झाल्याने उद्या दुपारी एक वाजता माणिकपूर येथील साईनगर मैदानात विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून माजी आमदार विवेक पंडित उपस्थित राहणार आहेत. आता हीच मागणी अन्य महापालिकातही जोर धरणार आहे. (प्रतिनिधी)