सफाई कामगारांचे ‘कामचोरी’ रॅकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 11:50 PM2019-09-01T23:50:59+5:302019-09-01T23:51:22+5:30
पंकज पाटील, अंबरनाथ शहर स्वच्छतेचा राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळविणाऱ्या अंबरनाथ पालिकेला आणि नगरसेवकांना आता शहर स्वच्छतेची मोठी समस्या ...
पंकज पाटील, अंबरनाथ
शहर स्वच्छतेचा राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळविणाऱ्या अंबरनाथ पालिकेला आणि नगरसेवकांना आता शहर स्वच्छतेची मोठी समस्या भेडसावत आहे. शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यावर कामगारांना सलग दोन दिवस सुटी आल्याने या कामगारांच्या कामाचे नियोजन करण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. मात्र, सरकारी सुटी असल्याचे कारण पुढे करून अधिकाऱ्यांनीही हात वर केले. शहरात आपत्कालीन स्थितीत किमान स्वच्छतेसाठी नियोजनाची आणि कामगारांनी सहकार्याची भूमिका घेणे गरजेचे होते. इतर दिवशी आठ तासांऐवजी तीन तास काम करून पळ काढणाºया कामगारांना कुणीही बोलत नाहीत. मात्र, आपत्कालीन परिस्थितीत किमान याच कामचोर कर्मचाºयांनी नियोजित वेळेनुसार काम करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा धरणे गरजेचे आहे. मात्र, परिस्थिती काहीही असो, कर्मचारी आपल्या मर्जीप्रमाणेच काम करताना दिसतात. त्यामुळे या कामगारांकडून काही अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
शहरात घंटागाडी सुरू केल्याने शहरातील नाक्यानाक्यांवरील कचरा उचलला जात आहे. मात्र, अंतर्गत गल्ली आणि शहरातील आतील भागातील कचरा उचलण्याची आणि प्रभाग स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही पालिकेच्या सफाई कर्मचाºयांचीच आहे. मात्र, अंबरनाथ पालिकेतील सफाई कर्मचाºयांचे मोठे रॅकेट शहरात उभे राहिले आहेत. त्यामुळे शहर स्वच्छतेच्या मोहिमेला अडथळा निर्माण झाला आहे. अंबरनाथ पालिकेतील सफाई कर्मचारी यांच्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही आरोग्य विभागातील सहायक स्वच्छता निरीक्षकांवर आहे. मात्र, हे निरीक्षक पालिकेच्या पगारावर कमी कर्मचाºयांकडून हप्तावसुलीवर आपला उदरनिर्वाह करत आहेत. ज्या सफाई कर्मचाºयांना प्रभागात पूर्णवेळ काम न करता घरी लवकर जाण्याची इच्छा आहे, अशा कर्मचाºयांनी या निरीक्षकांना महिनाकाठी एक ते तीन हजार रुपये देणे बंधनकारक केले आहे. पालिकेतील निम्मे कर्मचारी हे सकाळी हजेरी लावून प्रभागात काम न करता खाजगी कामासाठी निघून जातात. काही कर्मचारी हे प्रभागात दोन ते तीन तास काम करून घरी जातात. सहायक स्वच्छता निरीक्षकांचे पालिकेच्या सफाई कर्मचाºयांसोबत निर्माण झालेले आर्थिक हितसंबंध शहराच्या स्वच्छतेला आणि नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरत आहे.
अंबरनाथ पालिकेत ७५० हून अधिक सफाई कर्मचारी शहरात कार्यरत आहेत. त्यात आता नव्याने अनुकंपावरील कर्मचाºयांचीही भरती करण्यात आली आहे. मात्र, एवढे कर्मचारी असतानाही त्यातील मोजकेच कर्मचारी हे नियमित काम करताना दिसतात. अनेक कर्मचारी हे दोन ते तीन तास काम करून घरी निघून जातात. या कर्मचाºयांना सकाळी साडेसहा वाजता हजेरी बंधनकारक आहे. ही हजेरी लावल्यावर कर्मचाºयांना प्रभागात काम करणे गरजेचे असते. मात्र, त्यातील अनेक कर्मचारी हे हजेरी लावल्यावर कामावर मात्र सकाळी ८ नंतर येतात. त्यातही १० ते ११ वाजेपर्यंत काम केल्यावर पुन्हा हे कर्मचारी प्रभागातून निघून जातात. अनेक कर्मचारी या कालावधीत रिक्षा चालवणे, भाजीविक्री करणे अशी अनेक खाजगी कामे करतात. त्यातील काही कर्मचारी हे एमआयडीसीमध्ये खाजगी कामही करतात. सकाळी हजेरी लावल्यावर दुपारी अडीच वाजता पुन्हा हजेरी घेतली जाते. मात्र, त्या हजेरीसाठी विलंब न लावता हजर राहतात. सकाळी आणि दुपारी हजेरीही बंधनकारक असल्याने हे कर्मचारी दोन्ही हजेरी नियमित लावतात. कर्मचाºयांच्या या ‘कामचोरी’ला आता नगरसेवकही वैतागले आहेत. अनेक नगरसेवकांनी त्यांच्यामागे लागण्याचे काम सोडून दिले आहे. अधिकाºयांना सांगूनही कर्मचाºयांच्या कामाच्या शैलीत बदल होत नसल्याने त्याला अधिकारीच जबाबदार राहतात.
स्वच्छतेचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळविणाºया अंबरनाथ शहराला आजही स्वच्छ शहरासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. सर्वात मोठी समस्या म्हणजे अंबरनाथ पालिकेतील सफाई कर्मचारी. हे कर्मचारी आपल्या ठरलेल्या वेळेत पूर्ण क्षमतेने काम करीत नसल्याने शहरातील अनेक भाग हे स्वच्छतेच्या प्रतीक्षेत आहेत. आठ तासांचे काम निश्चित असताना अंबरनाथ पालिकेतील कर्मचारी हे केवळ दोन ते तीन तासच काम करतात. त्यांच्या या कामाच्या शैलीला अंबरनाथ पालिकेतील आरोग्य निरीक्षकही जबाबदार आहेत. सफाई कर्मचाºयांनी शहरात अधिकाºयांना हाताशी धरून मोठे रॅकेट उभे केले आहे. काम करा की न करा, पूर्ण पगार देण्याची जबाबदारी आता पालिकेचे अधिकारी उचलत आहेत. अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील हे ‘कामचोरी’ रॅकेट उद्ध्वस्त करण्याची गरज आहे.
कंत्राटी कामगार नेमण्याचा विचार
अंबरनाथमध्ये पालिकेचे कर्मचारी काम करत नसल्याने कंत्राटी मजुरांची नेमणूक करावी, असा सूर लावला जात आहे. त्या अनुषंगाने निविदाही काढण्यात आल्या आहेत. कंत्राटी कर्मचाºयांची गरज असली तरी आर्थिकदृष्ट्या पालिकेला ते परवडणारे नसल्याने या कामाला गती मिळत नाही. शहरासाठी कामगारांची गरज असली, तरी तो निर्णय पालिकेला घेणे अवघड आहे.