मोबाईल अॅपद्वारे अस्वच्छतेची तक्रार केल्यास १२ तासांत स्वच्छता करणार; पालिका आयुक्तांची विद्यार्थ्यांना ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 06:54 PM2017-12-20T18:54:53+5:302017-12-20T18:55:13+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेने स्वच्छता मोहिमेंतर्गत बुधवारी येथील शंकर नारायण महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
राजू काळे
भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेने स्वच्छता मोहिमेंतर्गत बुधवारी येथील शंकर नारायण महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात स्वच्छता सर्व्हेक्षण २०१८ साठी मोबईलमध्ये डाऊनलोड करण्यात आलेल्या स्वच्छता-मोहुआ या अॅपद्वारे सार्वजनिक ठिकाणच्या अस्वच्छतेची फोटासह तक्रार केल्यास येत्या १२ तासांत ती स्वच्छ केली जाईल, अशी ग्वाही आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी विद्यार्थ्यांना दिली.
शहरात आजही अस्वच्छता पसरवली जात असली तरी त्यात पुर्वीपेक्षा घट झाल्याचा दावा प्रशासनाकडुन केला जात आहे. पालिका मुख्यालयासह इतर वास्तूंमधील शौचालये दुर्गंधीयुक्त तसेच बकाल अवस्थेत असली तरी त्याची दुरुस्ती अद्याप केली जात नाही. ओला व सुका कचय््रााचे वर्गीकरण अद्याप प्रशासनाच्या प्रयत्नांना यश देत नाही. कारण नागरीकांनी वर्गीकरणानुसार जमा केलेला कचरा एकत्रितपणेच गोळा केला जात असल्याचे दिसुन येत आहे. तसेच सुका कचरा गोळा करण्यासाठी दोन ते तीन दिवसांतुन कचरागाडीचे आगमन होते. त्यादरम्यान कचराकुंडी अथवा डब्यात साठविलेला सुका कचरा परिसरात पुन्हा पसरतो. प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर शहर १०० टक्के हणगदारी मुक्त झाल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी ठिकठिकाणी शौचालये बांधण्यात आली असुन त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी सुमारे २० ते २२ अधिकाऱ्यांवर सोपविली आहे.
मात्र तेथील स्वच्छता सर्व्हेक्षणावेळी वर्षातुन एकदाच पाहिली जात असल्याने नावापुरती असलेली स्वच्छता काय कामाची, असा प्रश्न नागरीकांकडुन उपस्थित केला जात आहे. यातील १०० टक्के कचरा वर्गीकरण व हगणदारीमुक्तीनेच शहरातील स्वच्छतेचा गतवर्षीच्या सर्व्हेक्षणात घात केल्याचे सिद्ध झाल्याने यंदाही त्याचा अडसर दुर करण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्नील असल्याचे सांगितले जात आहे. शहरातील स्वच्छतेची पाहणी केंद्र सरकारच्या पथकाद्वारे जानेवारी २०१८ मध्ये होण्याची शक्यता गृहित धरुन आयुक्तांनी सर्व शाळा, महाविद्यालयांत स्वच्छतेचा संदेश देणाय््राा कार्यशाळेचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने भार्इंदर पुर्वेकडील शंकर नारायण महाविद्यालयात बुधवारी स्वच्छतेच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना आयुक्तांनी मोबाईल अॅपद्वारे प्राप्त तक्रारीवर १२ तासांत कार्यवाही करण्याची ग्वाही विद्यार्थ्यांना दिली. तसेच हे अॅप जास्तीत जास्त लोकांना मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष रोहिदास पाटील, सचिव महेश म्हात्रे, प्राचार्या रंजना पाटील, शिक्षणाधिकारी सुरेश देशमुख, माजी नगरसेविका कल्पना म्हात्रे आदी उपस्थित होते.