उल्हासनगरातील स्वच्छता अभियानाची खा. शिंदे यांच्याकडून पाहणी, महापालिका रुग्णालयाला भेट
By सदानंद नाईक | Published: January 5, 2024 07:17 PM2024-01-05T19:17:22+5:302024-01-05T19:17:29+5:30
कोरोना महामारीला तोंड देण्यासाठी महापालिकेने रिजेन्सी येथे रुग्णालय उभारून ११ कोटी पेक्षा जास्त किंमतचे साहित्य खरेदी केले होते.
उल्हासनगर: शहरातील स्वच्छता अभियानाची व महापालिका रिजेन्सी येथील रुग्णालयाची पाहणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. यावेळी आमदार कुमार आयलानी, बालाजीकिणीकर, महापालिका आयुक्त अजीज शेख आदीजन उपस्थित होते. उल्हासनगर महापालिका साफसफाई स्वच्छता अभियानाबाबत अग्रेसर असून मुंबईपासून सुरुवात झालेले हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जात असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी शहर स्वच्छता अभियान भेटी वेळी दिली. वाढत जाणारे शहरीकरण पाहता आता मनुष्यबळापेक्षा यांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्याची गरज निर्माण झाल्याचे शिंदे म्हणाले. तसेच आठवड्यातील तीन दिवस महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग निहाय विशेष डीप क्लीन अभियान राबविले तर शहर स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत होईल. अशी भावना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
शहरातील स्वच्छता अभियानाची पाहणी केल्यानंतर, खासदार श्रीकांत शिंदे यांनी रिजेन्सी येथील महापालिका रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालय कामाची पाहणी केली. कोरोना महामारीला तोंड देण्यासाठी महापालिकेने रिजेन्सी येथे रुग्णालय उभारून ११ कोटी पेक्षा जास्त किंमतचे साहित्य खरेदी केले होते. रुग्णालय उदघाटनाच्या प्रतिक्षेत असतांना अचानक रुग्णालयाचे खाजगीकरण झाल्याने, आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खासदार शिंदे यांच्या पाहणी दौऱ्या वेळी आमदार डॉ.बालाजी किणीकर, आमदार कुमार आयलानी, महापालिका आयुक्त अजीझ शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्यासह स्थानिक पक्ष पदाधिकारी आदीजन उपस्थित होते.