उल्हासनगर महापालिकेची इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत स्वच्छता मोहीम, नागरिकांचा प्रतिसाद
By सदानंद नाईक | Published: September 17, 2022 04:04 PM2022-09-17T16:04:52+5:302022-09-17T16:05:48+5:30
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार इंडियन स्वच्छता लीग या ७ हजार ५०० गुणांच्या स्पर्धेत देशातील एकूण ९२ शहरांनी सहभाग घेतला आहे.
सदानंद नाईक
उल्हासनगर : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार इंडियन स्वच्छता लीग या ७ हजार ५०० गुणांच्या स्पर्धेत देशातील एकूण ९२ शहरांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेत प्रथम दहा मध्ये येण्यासाठी त्यांच्यात चडाओड लागली असून महापालिकेने शहाड बिर्ला गेट दरम्यान स्वच्छता मोहीम राबवून उपक्रमाची चुणूक दाखविली.
उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत शहराच्या स्पर्धेत प्रथम दहा मध्ये येण्यासाठी तयार असल्याची माहिती दिली. या स्पर्धेमुळे देशभरातील अनेक शहरे चमकणार आहेत. केंद्र शासनाने पहिल्यांदाच अशा स्पर्धेचे आयोजन केले असून त्यात पहिल्या १० मध्ये येण्यासाठी उल्हासनगर महापालिकेने देखील कंबर कसली. यासाठी महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, नागरिक, सामाजिक संघटना प्रतिनिधी, युवक व युवतींना स्वच्छता मोहिमेत सामावून घेण्यात येत आहे. ही स्पर्धा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आली असून त्यात सहभाग घेण्याकरिता महापालिकेने जारी केलेल्या लिंकचा वापर करून नोंदणी करण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले आहे.
स्वच्छता अभियान कार्यक्रमाचा भाग म्हणून १७ सप्टेंबर रोजी आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत सेवा दिवस निमित्त शहरातील शहाड स्टेशन ते बिर्ला मंदिर पर्यंत प्लॉग रनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपायुक्त सुभाष जाधव, सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार यांच्यासह माजी नगरसेवक रेखा ठाकूर, समाजसेवक शिवाजी रगडे, ज्योती तायडे, तसेच शहरातील सामाजिक संस्था, समाजसेवक, शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक, विद्यार्थी तसेच एन.एस.एस. विद्यार्थी उपस्थित होते. या सर्वांनी प्लॉग रन मध्ये सहभागी होऊन बिर्ला मंदिर परिसराची सफाई व स्वच्छता केली. उल्हासनगर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी या महोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी नागरिकांना अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांवेळी आवाहन केले.