पाणीटंचाईमुळे स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 01:06 AM2019-05-26T01:06:16+5:302019-05-26T01:06:20+5:30
मुरबाड तालुक्यात पाणीटंचाईची गंभीर समस्या असून पाणीपुरवठा विभागाकडे २२ गावे आणि ४७ वाड्यापाड्यांचे पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव आले आहेत.
मुरबाड तालुक्यात पाणीटंचाईची गंभीर समस्या असून पाणीपुरवठा विभागाकडे २२ गावे आणि ४७ वाड्यापाड्यांचे पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव आले आहेत. मात्र, प्रशासकीय मंजुरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिली जात असल्याने टंचाईग्रस्त गावांना मागणी नुसार पाणीपुरवठा होत नसल्याने स्वच्छ भारत अभियानाचा पुरता बोजवारा उडाला आहे. बहुतेक ठिकाणी प्यायलाच पाणी मिळत नाही, तर शौचासाठी पाणी कोठून आणणार? यामुळे शौचासाठी अनेक ग्रामस्थांवर नाइलाजास्तव दगड, झाडाच्या पानांचा आधार घेण्याची वेळ आली आहे. यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्यातील पाटगाव, खोपिवली, घागुर्ली, मेर्दी, कोळोशी, उमरोली खु., कोचरे, चासोळे खु., चासोळे बु., कळमखांडे, थितबी, झाडघर, तुळई, कळभांड मु., करवेळे, महाज, तळवली बा., वैशाखरे, साजई, सासणे, करचोंडे तसेच खेवारे ही २२ गावे आणि साकुर्ली ठाकूरवाडी, पाटगाव, वाघाचीवाडी, खांड्याचीवाडी, केवारवाडी, पेंढरी वाघवाडी, बांगरवाडी, बोरवाडी, लोत्याचीवाडी, उंबरवाडी, दिवाणपाडा, देवराळवाडी, भोईरवाडी, मोडकपाडा, दुर्गापूर, कळभांड वाघवाडी, दांडवाडी, मुरब्याचीवाडी, वैतागवाडी, भांगवाडी, पादीरवाडी, गुमाळवाडी, शिळंद, पांडूचीवाडी, गेटाचीवाडी, चिंचवाडी, आंबेमाळी, कान्हार्ले, कातकरीवाडी, बनाचीवाडी, बांधणपाडा, धापडपाडा, सोकाळवाडी, मेंगाळवाडी, उंबरपाडा, लाकूडपाडा, प्रधानपाडा, गोड्याचापाडा, मोहरईपाडा, तोंडलीपाडा, टेपाचीवाडी, शिवेचीवाडी, शिरोशी कातकरीवाडी व खुटारवाडी, शिरवाडी, धारखिंड आणि मांडवत या ४७ वाड्यापाड्यांवर भीषण पाणीटंचाई असून पंचायत समितीकडे पिण्याच्या पाण्याच्या टँकरसाठी प्रस्ताव सादर झाले आहेत. सध्या जे टँकर मिळत आहेत, ते पाणी ग्रामस्थांना पुरेसे नाहीत.
प्यायलाच पाणी कमी पडते, तर कपडे, भांडी आणि शौचालयासाठी पाणी आणणार कुठून, असा यक्षप्रश्न लोकांना पडला आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी देऊ शकत नसल्याने अनेकांनी त्यांना जंगलात सोडून दिले आहे. अनेकांना दूरवरून डोक्यावरून पाणी आणावे लागते. पिण्यासाठी तसेच जेवणासाठी या पाण्याचा वापर होतो. शौचासाठी आम्ही झाडाच्या पानांचा वापर करतो, असे अनेक ग्रामस्थांनी खासगीत सांगितले. उघड्यावर शौचास बसणे आम्हाला आवडत नाही. मात्र, नाइलाजास्तव असे करावे लागते. त्यामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असून त्याचा आमच्या आरोग्यावर घातक परिणाम होणार आहे. आमच्या घरातील महिलांची यामुळे अडचण होते आहे. प्रशासनाने आम्हाला पुरेशा पाण्याचा पुरवठा करणे गरजेचे असल्याचे यावेळी अनेक ग्रामस्थांनी सांगितले. त्यातच, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांना शौचालयाचा वापर बंधनकारक असल्याने सध्याची परिस्थिती उघडकीस आली, तर त्यांची पदे धोक्यात येऊ शकतात. यामुळे सध्या याठिकाणी आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे.
>पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांना उघड्यावर शौचास जावे लागते, हे प्रशासनासाठी निंदनीय आहे. यामुळे स्वच्छ भारत अभियान हे अभियान न राहता सरकारची फसवेगिरी ठरली आहे.
- चेतनसिंह पवार, सचिव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदेश