दिवा रेल्वे स्थानकात स्वच्छता अभियान; दिवा रेल्वे प्रवाशी संघटनेचा उपक्रम, 250 किलो कचरा केला गोळा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 11:33 AM2018-01-08T11:33:34+5:302018-01-08T11:33:48+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर स्वच्छ भारत अभियान रेल्वे स्थानकामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यास सुरूवात झाली. सुरुवातीच्या काळात या अभियानाला प्रतिसाद मिळाला.
डोंबिवली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर स्वच्छ भारत अभियान रेल्वे स्थानकामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यास सुरूवात झाली. सुरुवातीच्या काळात या अभियानाला प्रतिसाद मिळाला. मात्र, कालांतराने अभियान बारगळल्याने सर्वच रेल्वे स्थानकात इतरस्त पडलेला कचरा, घाणीचे व अस्वच्छतेच्या साम्राज्याने अनारोग्याला निमंत्रण मिळत असते. आपण ज्या रेल्वे स्थानकातून नोकरी व्यवसायाकरीता लोकल ने प्रवास करतो त्या रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेबाबत आपण नेहमीचा रेल्वे प्रशासनाकडे बोट दाखवत असतो. आपण दैनंदिन प्रवास करीत असलेल्या रेल्वे स्थानकाची स्वच्छता असावी असे मना पासून वाटत असताना या स्वच्छतेसाठी आपला ही सहभाग असावा या हेतूने दिवा रेल्वे प्रवाशी संघटनेने रविवारी सकाळी दिवा रेल्वे स्थानकाच्या सर्वच फलाट व पादचारी पुलाची साफसफाई करून स्वच्छता अभियान राबविले.
नववर्षाची सुरुवात म्हणून प्रत्येक जण नवीन संकल्प करत असतो. असाच एक संकल्प दिवा रेल्वे प्रवाशी संघटनेच्यावतीने करून दिवा रेल्वे स्थानकाच्या स्वच्छता अभियान रविवारी ८ जानेवारी २०१८ रोजी आयोजित करण्यात होते. या स्वच्छता अभियानात १०० ते १५० रेल्वे प्रवासी सहभागी झाले होते. त्यांनी दिवा रेल्वे स्टेशनचे दोन पादचारी पूल, फलाट क्रमांक १,२,३,४,५,७ व ८ याची साफसफाई केली. तसेच दिवा स्टेशनच्या पश्चिमेला असलेल्या तिकीट घराचीही साफसफाई करण्यात आली. या सफसफाईमध्ये २०० ते २५० किलो कचरा जमा झाला. या साफसफाई मध्ये दिवा कोल्हापूर जिल्हा रहवाशी संघ, कोकण मराठा संघ, दिवा संघ, दिवा स्टेशन आरपीएफ ,जी.आर.पी व दिवा स्टेशनचे कर्मचारी ही सामील झाले होते.