स्वच्छता झाली; पण दिखाव्यापुरतीच!
By admin | Published: March 30, 2017 05:39 AM2017-03-30T05:39:54+5:302017-03-30T05:39:54+5:30
एमआयडीसी परिसरातील गणेश विसर्जन तलावाकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाले आहे
डोंबिवली : एमआयडीसी परिसरातील गणेश विसर्जन तलावाकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे त्याला डम्पिंगचे स्वरूप आल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच तलाव आणि परिसरातील कचरा तातडीने उचलण्यात आला. परंतु, तलावातील पाण्याला पडलेला जलपर्णींचा विळखा कायम आहे. त्यामुळे केडीएमसीने केलेली स्वच्छता ही एक प्रकारे दिखावा ठरली आहे.
केडीएमसीच्या या गणेश विसर्जन तलावाचे २००१ मध्ये सुशोभीकरण करण्यात आले. घरगुती गणपती विसर्जनाच्या सोयीसाठी या तलावाची निर्मिती करण्यात आली. परंतु, आजघडीला या तलावाकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाले. निर्माल्यकलश असतानाही निर्माल्य तसेच घरातील कचराही तलावात सर्रासपणे टाकला जात असल्याने येथील प्रदूषण जलचर प्राण्यांच्या जीवावर बेतत आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांअभावी येथील सुरक्षाही वाऱ्यावर पडल्याने एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
केवळ गणेशोत्सवात तलावाची स्वच्छता केली जाते. परंतु, त्यानंतर या तलावाकडे दुर्लक्ष होते. त्यात आता घरगुती गणपती, सार्वजनिक मंडळाचे तसेच मोठ्या उंचीच्या मूर्तींचेही येथे विसर्जन होत आहे. त्यामुळे येथील तलावातील पाणी प्रदूषित झाले आहे. त्यातच रहिवासी घरातील कचरा, निर्माल्यही त्यात टाकत आहेत.
या तलावाच्या दुरवस्थेच्या वास्तवाबाबत ‘लोकमत’ने नुकतेच ‘विसर्जन तलाव की डम्पिंग’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. यावर तातडीने तलावातील आणि त्यालगतच्या भागातील कचरा महापालिकेने उचलला. मात्र, तलावातील पाण्याची स्वच्छता करण्यात आली नाही. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे तलावातील जलपर्णींची वाढ होऊन तलावातील पाण्यावर शेवाळाचा हिरवा तवंग पसरला आहे. ही वाढती जलपर्णी घातक असून पाण्यातील आॅक्सिजनच्या मात्राला ती मारक ठरत आहे. त्यामुळे तलावातील जलचर प्राण्यांचा जीव धोक्यात आला आहे. (प्रतिनिधी)