ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करणार स्वच्छतेबाबतची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 04:08 PM2017-11-27T16:08:42+5:302017-11-27T16:11:33+5:30
स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी ठाणे महापालिका आता शालेय विद्यार्थ्यांचा आधार घेणार आहे. त्यानुसार हे विद्यार्थी किमान त्यांच्या घरच्यांना तरी स्वच्छतेबाबत जागरुक करतील हा मुळ उद्देश आहे.
ठाणे - शाळेत शिकणारे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य असल्याने त्यांच्याकडून आता काही कामे करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार स्वच्छतेबाबतची जनजागृती आता महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्याचा विचार पालिकेने सुरु केला आहे. त्यानुसार शाळेतील मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना स्वच्छतेबाबतची संकल्पना स्पष्ट करुन पुढील धोरण ठरविले जाणार आहे.
केंद्राच्या स्वच्छ शहर सर्व्हेक्षणाचा एक भाग म्हणून ठाणे महापालिकेने यंदा देखील या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. सध्या ठाणे महापालिका स्वच्छतेबाबतीत खालच्या क्रमांकावर आहे. त्यामुळे हा नंबर वाढविण्यासाठी पालिकेच्या वितीने विविध उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेने आता शहरातील शाळांच्या माध्यमातून स्वच्छतेबाबतची जनजागृती केली जाणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात महापालिका शाळांच्या माध्यमातून ही जनजागृती केली जाणार आहे. त्याची आखणी करण्याचे काम सुरु झाले आहे. यामध्ये महापालिका शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा महापालिकेचा विचार आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहेत, त्यामुळेच त्यांनी किमान आपल्या घरच्यांना जरी स्वच्छतेबाबत कशा पध्दतीने काळजी घ्यावी एवढे जरी काम केले तरी त्यामुळे घरची मंडळी यामुळे जागृत होऊन स्वच्छतेबाबतची काळजी घेतील असा पालिकेचा उद्देश आहे. त्यानुसार पुढील महिन्यात पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात या जनजागृतीस सुरवात होईल अशी अपेक्षा गृहीत धरण्यात आली आहे.
विद्यार्थी दशेपासून त्यांना स्वच्छतेबाबत जर माहिती झाली तर भविष्यात याबाबत आणखी जागरुक होतील हा मुळ उद्देश आहे. त्यादृष्टीने आता विचार सुरु झाला आहे.
(समीर उन्हाळे - अतिरिक्त आयुक्त, २ - ठामपा)