सफाई कामगारांनो, आता झाडू सोडा!
By Admin | Published: May 29, 2017 06:15 AM2017-05-29T06:15:42+5:302017-05-29T06:15:42+5:30
अतिदलित समाजातील सफाई कामगारांनी हातातील झाडू सोडून शिक्षणाचा मार्ग अवलंबवावा. केवळ दहावी, बारावी नव्हे; तर त्यांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अतिदलित समाजातील सफाई कामगारांनी हातातील झाडू सोडून शिक्षणाचा मार्ग अवलंबवावा. केवळ दहावी, बारावी नव्हे; तर त्यांनी उच्च शिक्षण घ्यावे आणि आपल्या समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र यावे, असा आग्रह रविवारी झालेल्या चर्चासत्रात धरण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी गेल्या वर्षी केलेल्या संशोधनावर आधारित शोध निबंधातून पुढे आलेल्या अतिदलित सफाईगार जातींच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून पुढील सामूहिक कृती कार्यक्रम आणि रणनीती ठरविण्यासाठी रविवारी टाऊन हॉल येथे देशभरातील कार्यकर्त्यांसाठी दिवसभराचे चर्चासत्र झाले. त्यात हा आग्रह धरण्यात आला.
सफाई कामगारांसाठी केंद्र व राज्य शासनाने नेमलेल्या अनेक समिती, आयोगाच्या शिफारशी आणि त्यांच्यासाठी असलेल्या सरकारी योजनांबाबत या समाजातील ८१ टक्के लोकांना माहितीच नाही. सरकार कोट्यवधी रूपये सफाईगारांच्या योजनांवर करीत असताना हा पैसा जातो कुठे? याबाबत केंद्रीय महालेखापरीक्षकांनी (कॅग) २००३ साली शेरा मारल्याची बाब खैरालिया यांच्या अभ्यासातून पुढे आली. ही परिस्थिती या चर्चासत्रात मांडण्यात आली. सफाई कामगारांसाठी केंद्र व राज्य शासनाने नेमलेल्या अनेक समित्या, आयोगांनी सफाई कामगारांच्या कामाच्या पद्धतीत सुधारणा केल्या असल्या; तरी त्यांच्या हातातील ‘झाडू छोडो’साठी प्रयत्न झालेले नाहीत. यातून बाहेर पडण्यासाठी समाजाने आता कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. त्यांनी स्वत:पासून सुरूवात करावी. अतिदलित सफाई कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचे अभियान देशभर सुरू आहे. या अभियानामार्फत वस्त्यावस्त्यांमध्ये चर्चासत्र करून, विचारविनिमयातून भविष्यात आंदोलन उभे करण्याचा निर्धार करण्यात आला.
बिहार राज्याचे अनुसूचीत जाती आयोगाचे माजी सदस्य व महादलित संघटनांचा अखिल भारतीय परिसंघाचे अध्यक्ष बबन रावत म्हणाले, आयोग, समिती यांनी या सफाई कामगरांची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केला. परंतु त्यांनी त्यांच्या हातातील झाडू, बादली सुटावी यासाठी प्रयत्न केले नाही. या महादलितांसाठी काम करण्याची गरज आहे. त्यांनी झाडू सोडावा आणि शिक्षणाची कास धरावी. प्रत्येक सफाई कामगाराने शिक्षण घ्यावे, स्वत:बरोबर कुटुंबालाही शिक्षित करावे, स्वत:ची आर्थिक परिस्थिती मजबूत करावी, आधी त्यांनी स्वत:ला दिशा द्यावी; मग समाजाला दिशा देण्याचा विचार करावा.
सफाई कामगाराच्या मुलाने हातातील झाडू सोडून इतर कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त केले असेल; तर अशा मुलांचा १५ आॅगस्टला सत्कार केला जाणार आहे. तरच प्रेरणा निर्माण होईल, असे संजय मंगो यांनी सांगितले. पिढ्यानपिढ्या सफाईच्या कामात अडकलेल्या वाल्मिकी, रु खी, मेहतर, सुदर्शन, डोम-डुमार इत्यादी अतिदलित जातींची आर्थिक-सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्थिती यावेळी मांडण्यात आली. या चर्चासत्रात किरणभाई वाघेला (रुखी सेवा समाज महापंचायत), राजेंद्र मर्दाने (चंद्रपुर), प्रो. माधवी खोत (एसएनडीटी कॉलेज), कल्पेश वाल्मिकी (गुजरात), चंदनलाल वाल्मिकी (उत्तर प्रदेश), प्रकाश सनगत (कोल्हापूर), प्रदीप हजारे, हरिश नक्के (नागपूर), ललित बाबर, मुकेश (बागपत), बिरमसिंग कीर (पत्रकार), डॉ. नीता साने, मुक्ता श्रीवास्तव, टप्पू राठोड, बिरपाल भाल, धर्मवीर मेहरोल (ठाणे), लतीफभाई (मुस्लिम मेहतर कामगार संघटना), डॉ. सुनिल यादव, सुनिल चव्हाण, दीपिका बेन वाघेला, जगदीश वाल्मिकी आदींसह महाराष्ट्रासह विविध राज्यात या समाजाला न्याय मिळवून देण्याचा लढाईत विविध प्रकारे सक्रीय असलेले मान्यवरांसह बाल्मिकी, रुखी, मेहतर, सुदर्शन, डोम-डुमार इ. अतिदलित जातींचे विविध संघटनांचे प्रतिनिधी-कार्यकर्ते आणि सफाईच्या कामात प्रत्यक्ष कार्यरत सफाई कामगार या चर्चेत सहभागी झाले होते. खैरालिया यांनी आभार मानले.
सफाई कामगारांबद्दलचा तिरस्कार अजूनही कायम
सफाई कामगारांबद्दल समाजात अजूनही तिरस्काराची भावना आहे. अनेक राज्यांत त्यांना घराचा उंबराही चढू दिला जात नाही. त्यामुळे समाजात असून बहिष्कृत केले जात असल्याची भावना त्यांच्या मानत आहे... ही खळबळ त्यांनी मांडली, ‘लोकमत’कडे. प्रत्यक्षपणे अतिदलित समाजावर अन्याय-अत्याचार होत नसले, तरी ते वेगवेगळ््या मार्गाने केले जातात. कमी वेतनात राबविणे, या समाजाच्या वस्त्यांमध्ये पुरेशा सोयी-सुविधा न देणे यासारख्या अनेक अन्यायाला सामोरे जावे लागते. सरकारने समाजासाठी अनेक योजना राबविल्या. पण त्यांची अंमलबजावणी झाली नाही, अशी व्यथा उत्तर प्रदेश, गुजरात, ठाणे, मुंबई परिसरातून आलेल्या अतिदलित समाजातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
सफाईगार जातींच्या प्रश्नांवर चर्चा करून रणनीती ठरविण्यासाठी झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. मी झाडू मारतो. परंतु आजही समाजात तिरस्काराची भावना आहे, असे गुजरात येथून आलेले विकास सोलंकी यांनी सांगितले. उत्तर प्रदेशमधील पंचायत सदस्य मुकेश कुमार म्हणाले, वाल्मिकी समाज हा गावात साफसफाईचे काम करीत असला तरी आजही त्यांना उच्चवर्णीय उंबरठ्याच्या आत घेत नाही. या समाजावार अन्याय-अत्याचार आजही होत आहेत. परंतु त्याचे स्वरुप बदलले आहे.
बदाइयो या जिल्ह्यात नाभिकांच्या दुकानात जाऊन केस कापायला या समाजाला बंदी आहे. या समाजाचे केस कापल्यास आम्ही तुमच्या दुकानात पाय ठेवणार नाही, अशी वागणूक उच्चवर्णीयांकडून मिळते. दिल्ली महापालिकेत १९९८ पासून या समाजातील लोक काम करीत आहेत. परंतु आजही त्यांना कायम केलेले नाही, याकडे कुमार यांनी लक्ष वेधले. गुजरातमधील महादलित संघटनेचे महासचिव कल्पेश वाल्मिकी म्हणाले, राजकोट येथील गौंडल गावातील नगरपालिकेत वाल्मिकी समाजातील लोक सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. चार ते पाच महिने झाले, तरी त्यांना पगार मिळत नाही. कायद्यामुळे उच्चवर्णीयांकडून भेदभावाची मिळत असलेली वागणूक व्यवहारात दिसत नसली; तरी त्यांची मानसिकता अजूनही बदललेली नाही.