२५ हजारांची लाच घेताना लिपिक अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:46 AM2021-08-13T04:46:09+5:302021-08-13T04:46:09+5:30
मीरा रोड - फेरफार करून सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी २५ हजारांची लाच घेताना मीरा-भाईंदर तहसील कार्यालयातील लिपिकास अटक करण्यात आली ...
मीरा रोड - फेरफार करून सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी २५ हजारांची लाच घेताना मीरा-भाईंदर तहसील कार्यालयातील लिपिकास अटक करण्यात आली आहे. ठाणे न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार यांनी त्यांची सासू, पत्नी व मेव्हणी यांचे फेरफार करून सात बारामध्ये नाव नोंद करण्याकरिता अपर तहसीलदार कार्यालयात जानेवारी महिन्यात अर्ज केला होता. कार्यालयातील लिपिक भूषण घोरपडे याने ८ एप्रिल रोजी या कामासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितली व त्याची ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पडताळणी करण्यात आली.
बुधवारी सायंकाळी सापळा रचला असता भूषण याने साहेबाकरिता २५ हजार रूपये व स्वतःकरिता १५ हजार रूपये अशी लाच मागणी करुन २५ हजार लाच स्वीकारताच त्याला पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर गुरुवारी आरोपी लोकसेवक याला ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.