केडीएमसीतील प्रभागांची धुरा लिपिकांच्या हाती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:44 AM2021-08-28T04:44:07+5:302021-08-28T04:44:07+5:30
कल्याण : केडीएमसी आयुक्तांनी नुकत्याच काही प्रभाग अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यांच्या जागी अधीक्षक व सहायक आयुक्त दर्जाचा सक्षम अधिकारी ...
कल्याण : केडीएमसी आयुक्तांनी नुकत्याच काही प्रभाग अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यांच्या जागी अधीक्षक व सहायक आयुक्त दर्जाचा सक्षम अधिकारी न सापडल्याने कनिष्ठ अधिकाऱ्यांची प्रभाग अधिकारी पदावर वर्णी लावण्यात आली आहे. वरिष्ठ लिपिकांच्या हाती प्रभागाची धुरा गेल्याने प्रभाग क्षेत्र अधिकारी या पदाचे वरिष्ठांकडून अवमूल्यन होत असल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे.
आयुक्तांनी केलेल्या बदलीनुसार ‘ड’ प्रभागक्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांची बदली मालमत्ता विभागात झाली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या पदाची जबाबदारी मनपा मुख्यालयात विद्युत विभागातील वरिष्ठ लिपिक सविता हिले यांच्याकडे सोपवली आहे. अधीक्षक असलेले ‘ग’ प्रभाग क्षेत्र अधिकारी संदीप रोकडे यांची बदली शिक्षण विभागात केली आहे. तर ‘क’ प्रभाग क्षेत्र अधिकारी अक्षय गुडधे हे काही महिने रजेवर गेल्याने त्यांच्याकडील पदभार ‘अ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांच्याकडे अतिरिक्त म्हणून सोपविली आहे.
दरम्यान, प्रभाग क्षेत्र अधिकारी पदावर अधीक्षक तसेच सहायक आयुक्त पदाचा अधिकारी नेमणे आवश्यक असताना पुन्हा लिपिक नेमण्याची परंपरा मनपाने कायम ठेवली आहे. दहापैकी काही प्रभागांमध्ये आधीच लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडे प्रभाग अधिकारीपदाची जबाबदारी दिली गेली आहे. दुसरीकडे ‘क’ प्रभागाचा आवाका मोठा आहे. त्यात फेरीवाला अतिक्रमण व अन्य मुद्दे महत्त्वाचे आहेत. तेथे अतिरिक्त जबाबदारी देण्याऐवजी स्वतंत्र अधिकारी नेमणे आवश्यक होते. ‘आय’ आणि ‘ग’ प्रभागाची जबाबदारी हाताळलेल्या आणि अधीक्षक असलेल्या रोकडे यांच्याकडे अथवा अन्य सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे प्रभागाची जबाबदारी देणे अपेक्षित होते; परंतु तसे झाले नाही. रोकडे यांची बदली शिक्षण विभागात मूळ जागी करण्यात आली. ‘अ’ प्रभागक्षेत्र अधिकारी सावंत यांना ‘क’ प्रभागाचा अतिरिक्त कार्यभार हाताळायचा आहे. त्यामुळे दोन्ही प्रभाग सांभाळताना सावंत यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
‘बदली हा प्रशासकीय कामाचा भाग’
संदीप रोकडे यांनी गुरुवारी शिक्षण विभागाच्या अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. ‘ग’ प्रभागातून त्यांची येथे बदली झाली. जुलैमध्ये लेटलतिफ कर्मचाऱ्यांना त्यांनी दालनांना टाळे ठोकत दणका दिला होता. त्यांच्या या कृतीवर कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांची बदली झाल्याची चर्चा होती; परंतु माझी बदली हा प्रशासकीय कामाचा भाग आहे. त्या घटनेचा व बदलीचा संबंध जोडणे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
-----------