ठाकुर्लीतील रेल्वे फाटक बंद, चोळेगाव, सारस्वत कॉलनी, जोशी हायस्कूल परिसरात वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 04:01 AM2018-06-13T04:01:58+5:302018-06-13T04:01:58+5:30
ठाकुर्ली स्थानकातील फाटकाच्या डागडुजीसाठी रेल्वेने रूळांमध्ये खोदकाम केले आहे. त्यामुळे सोमवारी मध्यरात्रीपासून अनिश्चित काळासाठी रेल्वेने फाटक बंद केले आहे.
डोंबिवली : ठाकुर्ली स्थानकातील फाटकाच्या डागडुजीसाठी रेल्वेने रूळांमध्ये खोदकाम केले आहे. त्यामुळे सोमवारी मध्यरात्रीपासून अनिश्चित काळासाठी रेल्वेने फाटक बंद केले आहे. परिणामी फाटक बंद करण्यावरून आठवडाभरापासून रेल्वे प्रशासन आणि केडीएमसी यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धाला यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, वाहनचालकांनी उड्डाणपुलाचा वापर सुरू केल्याने ठाकुर्ली, पंचायत विहीर, सारस्वत कॉलनी, जोशी हायस्कूल परिसर, पेंडसेनगर आदी भागांमध्ये वाहतूककोंडी होत आहे.
ठाकुर्ली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या नवीन उड्डाणपुलाचे उद्घाटन आचारसंहितेमुळे लांबणीवर पडले आहे. त्यातच रेल्वेने केडीएमसी, वाहतूक पोलीस यांच्याशी समन्वय न साधता ४ जूनपासून फाटक बंद करण्यात येत असल्याचे बॅनरद्वारे जाहीर केले होते. मात्र, केडीएमसीच्या विनंतीवरून रेल्वेने फाटक बंदीचा निर्णय मागे घेतला होता. पूर्व-पश्चिमेत येजा करणाºया गाड्यांची संख्या अधिक असल्याने फाटक दीर्घकाळ उघडे राहत होते. त्याचा फटका मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाला बसत आहे. त्यामुळे फाटक कायमस्वरूपी बंद करण्यासाठी रेल्वेची घाई सुरू आहे.
रेल्वेने आता फाटक उघडण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे कारण पुढे करत रूळांमध्ये खोदकाम केले आहे. फाटकातील रस्ता पूर्णत: उखडला गेला आहे. त्यामुळे तेथून एकही वाहन जाणे शक्य नाही. वाहनचालकांना ठाकुर्ली पूर्वेतून पंचायत विहीर अथवा सारस्वत कॉलनीतून, जोशी हायस्कूलमार्गे उड्डाणपुलावरून पश्चिमेस जावे लागत आहे. तसेच पश्चिमेतील वाहनेही याच मार्गाने कल्याणकडे रवाना होत आहेत. परंतु, चिंचोळ्या रस्त्यांमुळे तेथे कोंडी होत आहे.
सोसायटीतील जागेच्या अभावामुळे रहिवासी रस्त्यांवरच त्यांची वाहने उभी करत आहेत. ठिकठिकाणी रिक्षास्टॅण्ड आहेत. स्कूलबस, एखादा ट्रक आल्यास कोंडीत आणखी भर पडत आहे. कोंडीतून मार्ग काढताना वाहनचालक कर्कश हॉर्न वाजवत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. या आठवड्यात शाळा सुरू होत असून, कोंडीत स्कूलबस अडकल्यास त्याचा फटका विद्यार्थ्यांनाही बसणार आहे. त्यामुळे पालक चिंतेत आहे. ही कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थापन करावे, वाहतूक पोलीस व वॉर्डन तैनात करावेत, पार्किंगच्या नियमाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.
फाटकाची डागडुजी करताना केडीएमसीला विचारात न घेतल्याबाबत रेल्वेच्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाºयांना विचारले असता त्यांनी फाटकात तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास काम तातडीने करावे लागते, असे सांगितले. या कामाला किती वेळ लागेल, हे आताच सांगता येणार नाही. काम वेगाने सुरू आहे. ते पूर्ण होताच फाटक उघडण्याचा प्रयत्न केला जाईल. वाहनचालक पुलाचा वापर करत असल्याने कोणतीही गैरसोय होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेचे अभियंता शैलेश मळेकर म्हणाले की, यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने आम्हाला विचारात घेतलेले नाही. रेल्वेकडून फाटकाचे काम सुरू आहे. वाहतूक उड्डाणपुलमार्गे वळवावी, असे त्यांचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे आम्हालाही पूल बंद ठेवता येणार नाही. शिवाय वाहनेही पुलावरूनच जात आहेत.
पुलाशेजारील सोसायट्यांना त्रास
ठाकुर्ली उड्डाणपुलाची पूर्वेला जोशी हायस्कूलकडे उतरणारी बाजू बांधून तयार झाली आहे. मात्र, ठाकुर्ली-म्हसोबा चौकात जाणाºया पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. पुलालगत तसेच खाली कंत्राटदाराने साधनसामग्री ठेवली आहे. पुलाखालून जाणाºया रस्त्या अवस्था बिकट झाली आहे. सध्या पावसामुळे तेथे चिखल झाला आहे. पुलाशेजारी तसेच जलाराम मंदिर परिसरातील सोसायट्यांमधील रहिवाशांचे त्यामुळे हाल होत आहेत.
अरुंद पुलाचा फटका
ठाकुर्ली रेल्वेफाटक बंद झाल्याने फलाट गाठण्यासाठी बहुतांश प्रवासी मुंबई दिशेकडील पादचारी पुलाचा वापर करत आहेत. परंतु, हा पूल अरुंद आहे. एकाच वेळी चढणारा-उतरणारा असे अवघे दोन प्रवासी जेमतेम तेथून जावू शकतात.
सकाळी-सायंकाळी गर्दीच्या वेळी येथे चेंगराचेंगरी होण्याची भीती आहे.
त्यामुळे पुलाची रुंदी वाढवावी, अशी मागणी प्रवासी आणि चोळेगावातील नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
मानपाडा रस्त्यावरील स्टार कॉलनी येथील पुलाची पुनर्बांधणी सुरू आहे. त्यासाठी वाहतूक गांधीनगरमधून वळवली आहे. त्यामुळे तेथे वाहतूक पोलीस तैनात करावे लागत आहे. ठाकुर्लीचा पूल अधिकृतपणे खुला झालेला नाही. रेल्वे परस्पर निर्णय घेते असून, त्याची माहिती देत नाही. ठाकुर्लीत होणारी कोंडी फोडण्याकरता पुरेसे मनुष्यबळ नाही. तेथे वाहतूक पोलीस नेमताना कसरत करावी लागत आहे.
- गोविंद गंभीरे, वाहतूक पोलीस निरीक्षक