"कर्जत-कसारा मार्गावरील स्थानके बंदिस्त करा"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 11:48 PM2020-12-15T23:48:32+5:302020-12-15T23:48:36+5:30
रेल्वे प्रवासी महासंघाने केली मागणी; सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न
बदलापूर : रेल्वे प्रवाशांच्या व रेल्वेच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा तसेच रेल्वेच्या महसूल नुकसानीचा विचार करून मध्य रेल्वे प्रशासनाने कर्जत व कसारा मार्गावरील सर्व उपनगरी रेल्वे स्थानके बंदिस्त करावीत, अशी मागणी रेल्वे प्रवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व रेल्वेच्या सल्लागार समितीचे माजी सदस्य मनोहर शेलार यांनी केली आहे.
कल्याणपुढे शहाड ते कसारा अशी ११ स्थानके आहेत. तसेच विठ्ठलवाडी ते खोपोली अशी तब्बल १४ स्थानके आहेत. यापैकी बहुतेक स्थानके सर्वच बाजूंनी खुली व अनेक चोरवाटा असणारी आहेत. या दोन्ही मार्गांवरील अनेक स्थानकांतून आजवर रेल्वेच्या मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर चोरी झाली आहे. विनातिकीट प्रवास करून चोरवाटेने शेकडो प्रवासी पसार होण्याचे प्रमाण कर्जत व कसारा मार्गावर खूप मोठे आहे. त्यामुळे रेल्वेचे प्रचंड महसुली नुकसान वर्षानुवर्षे होत असल्याचे शेलार यांचे म्हणणे आहे.
ग्रामीण भागातील उपनगरी रेल्वे स्थानकांच्या व प्रवाशांच्या सुरक्षेकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्थानकांमध्ये सुधारणा कराव्यात, अशी आपली मागणी असून यासाठी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष तसेच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक व विभागीय व्यवस्थापक यांच्याशी पत्रव्यवहारही करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. ही स्थानके खुली असल्यामुळेच या दोन्ही मार्गांवरील तब्बल १२ स्थानकांवर प्रारंभीचे दोन महिने अत्यावश्यक सेवा कर्मचारी यांच्याकरिता लोकलही थांबविल्या जात नव्हत्या. त्यामुळे हजारो सरकारी नोकरदारांना प्रचंड त्रास भोगावा लागला होता, याकडेही शेलार यांनी लक्ष वेधले आहे.