उल्हासनगरमधील १० जीन्स कारखाने बंद
By admin | Published: July 4, 2017 06:56 AM2017-07-04T06:56:13+5:302017-07-04T06:56:13+5:30
वालधुनी नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने दहा जीन्स कापड प्रक्रिया कारखाने बंद केले आणि पाच
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : वालधुनी नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने दहा जीन्स कापड प्रक्रिया कारखाने बंद केले आणि पाच कारखानदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील यांनी नुकतीच उल्हासनगर महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यासोबत बैठक घेतली. वालधुनी नदी ही सगळ््यात जास्त प्रदूषित नदी असून तिचा नाला झाला आहे. या प्रकरणी अंबरनाथ व उल्हासनगरातील जागरूक नागरिकांनी एकत्रित येऊन ‘वालधुनी बचाव’ मोहीम आखली आहे. तिचाच भाग म्हणून जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्यासोबत ‘वालधुनी बचाव’ मोर्चा काढण्यात आला.
प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी वालधुनी नदीत सोडले जाते. त्यासाठी ‘सेपरेट सिव्हर’ हे घोषवाक्य घेत स्वाक्षरी मोहीम झाली. त्यात पाच हजार जण सहभागी झाले. त्याचे निवेदन सरकारी यंत्रणांना दिले. प्रक्रिया करुन स्वतंत्र वाहिन्यांद्वारे सांडपाणी खाडीत दूरवर सोडावे, अशी मागणी करण्यात आल्याचे वालधुनी जलबिरादरीचे कार्यकर्ते शशिकांत दायमा यांनी सांगितले.
जल बिरादरीचे आठ कार्यकर्ते त्यासाठी काम करीत आहेत. ८ आॅगस्ट हा उल्हासनगरचा स्थापना दिवस आहे. या दिवशी पुन्हा जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह उल्हासनगरात येणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली वालधुनी रिव्हर मार्च काढला जाईल. वालधुनी नदीत केवळ सांडपाणीच नव्हे, तर जीन्स कापड उद्योगातील रासायनिक सांडपाणी, उद्योगातून तयार होणारे रसायनमिश्रित पाणी, रासायनिक घनकचरा टाकला जातो. त्यावर ठोस कारवाईची मागणी जलबिरादरीने केली आहे.