बंद घरे चोरट्यांच्या ‘रडारवर’
By admin | Published: May 22, 2017 01:54 AM2017-05-22T01:54:40+5:302017-05-22T01:54:40+5:30
सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेलेली अथवा कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या मंडळींची घरे आता चोरट्यांच्या ‘रडावर’ आहेत. चोरट्यांनी कल्याण आणि ठाकुर्लीत मागील
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : उन्हाळ््याच्या सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेलेली अथवा कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या मंडळींची घरे आता चोरट्यांच्या ‘रडावर’ आहेत. चोरट्यांनी कल्याण आणि ठाकुर्लीत मागील दोन दिवसांत पाच घरेफोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी त्यांच्याकडून जोर धरत आहे.
कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरातील ओम गणेश सोसायटीत राहणारे गणेश रावळ हे शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास घराबाहेर गेले. ते सायंकाळी परतल्यानंतर घरी चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी कुलूप तोडून टीव्ही, मोबाइल, घड्याळ असा १९ हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी रावळ यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना कल्याण पूर्वेतील तीसगाव कमानीजवळ न्यू गंगातीर्थ सोसायटीत घडली. तेथील एक महिला शनिवारी बाहेर गेली. चोरट्यांनी तिचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड मिळून एक लाख ९१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ती सायंकाळी घरी परतताच चोरीचा प्रकार पाहून तिला धक्काच बसला. तिने कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. तिसरी घटनेत सुनील कुमार यादव (रा. पिसवली) हे शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास घराबाहेर पडले. चोरट्यांनी त्यांच्या घरातून सोन्याचे-चांदीचे दागिने, घड्याळ व रोकड मिळून ४६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी यादव यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस पुढील तपास करत आहेत.
चौथी घटना ठाकुर्लीत घडली आहे. अर्थव चाळके (रा. अंकिता अपार्टमेंट) हे गुरुवारी रात्री घराबाहेर गेले. ते शनिवारी परतल्यानंतर चोरट्यांनी त्यांचा दरवाजा फोडून घरातील तीन मोबाइल आणि एक सोन्याची चेन असा ३० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी अथर्व यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.