प्रशासन, सत्ताधा-यांच्या दिरंगाईचा कळस, स्थगित महासभेचे कामकाज चालले पाच महिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:48 AM2018-01-20T01:48:43+5:302018-01-20T01:48:45+5:30
पालिका प्रशासन आणि सत्ताधाºयांच्या दिरंगाईने अक्षरश: कळस गाठला आहे. सप्टेंबरमध्ये स्थगित झालेल्या महासभेचे कामकाज जानेवारी उजाडला तरी पूर्ण झालेले नाही.
उल्हासनगर : पालिका प्रशासन आणि सत्ताधाºयांच्या दिरंगाईने अक्षरश: कळस गाठला आहे. सप्टेंबरमध्ये स्थगित झालेल्या महासभेचे कामकाज जानेवारी उजाडला तरी पूर्ण झालेले नाही. सतत सहा वेळा स्थगित झालेल्या सभेचे काम कधी पूर्ण होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, उद्या दुपारी तीन वाजता ही स्थगित तर चार वाजता नियमित महासभा होणार आहे.
महासभेच्या कामकाजात सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाचे नगरसेवक ढवळाढवळ, गोंधळ घालत असल्याने अनेक महासभा कामकाजाविना स्थगित करण्याची वेळ महापौरांवर आली. गोंधळ व दिरंगाईचा फटका विकासाला बसत आहे. महापौर मीना आयलानी यांनी १५ सप्टेंबरला बोलावलेल्या महासभेत गोंधळ व गदारोळ घातला. अखेर महापौरांनी सर्वसंमतीने महासभा स्थगित करून ९ आॅक्टोबरला सभा बोलावली. पुन्हा गोंधळामुळे महासभा स्थगित करून ३१ आॅक्टोबरला बोलावली.
असे करता करता महासभेला चक्क जानेवारी महिना उजाडला आहे. एकाच महासभेच्या कामकाजाला जर अर्ध वर्ष लागत असेल तर महापालिकेचे कामकाज कोणत्या पध्दतीने चालते? याचा प्रत्यय नागरिकांना आला आहे.
हे आहेत महासभेतील विषय
१५ सप्टेंबरच्या स्थगित महासभेत एकूण २३ विषय व प्रस्ताव आहेत. यामध्ये महापालिका शाळा क्रं-४ ही शारदा प्रसारक मंडळाला दरमहा ३० हजाराने भाडयाने देणे, महापालिका अधिकारी युवराज भदाणे यांना निलंबित करणे व अभिनंदन असे परस्पर विरोधी दोन ठराव, कल्याण ते अंबरनाथ रस्ता रूंदीकरणातील बाधितांना पर्यायी जागा देणे, मालमत्ता कर आकारणी चुकीची असून त्यात बदल करणे हे प्रस्ताव आहेत.