कल्याण-डोंबिवलीत ‘स्वशक्ती’ पुरवणार कापडी पिशव्या

By admin | Published: July 3, 2017 06:12 AM2017-07-03T06:12:19+5:302017-07-03T06:12:19+5:30

कल्याण-डोंबिवली शहरे प्लास्टिकमुक्त करण्याची घोषणा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी करताच शहरातील ‘स्वशक्ती’ या महिला

Cloth bags that will provide 'self-protection' in Kalyan-Dombivli | कल्याण-डोंबिवलीत ‘स्वशक्ती’ पुरवणार कापडी पिशव्या

कल्याण-डोंबिवलीत ‘स्वशक्ती’ पुरवणार कापडी पिशव्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरे प्लास्टिकमुक्त करण्याची घोषणा महापौर राजेंद्र देवळेकर यांनी करताच शहरातील ‘स्वशक्ती’ या महिला संघटनेने त्यांच्याकडे धाव घेतली आहे. या संघटनेने तयार केलेल्या कापडी पिशव्यांना ग्राहक नसल्याची बाब त्यांनी या वेळी मांडली. अखेर, देवळेकर यांनी त्यांच्याकडून कापडी पिशव्या घेण्यास सहमती दर्शवली.
डिसेंबर २०१६ पासून कार्यरत असलेल्या ‘स्वशक्ती’ संघटनेत डॉ. भाग्यश्री मोघे, साधना जोशी, रेखा शिधोरे, अमृता मोडक, भाग्यश्री कुलकर्णी, भारती चाफेकर आदी कार्यरत आहेत. डॉक्टर, शिक्षिका, मुख्याध्यापिका अशा विविध पदांवर संघटनेच्या सदस्या कार्यरत आहेत. त्या त्यांचा नोकरी-व्यवसाय सांभाळून सामाजिक उपक्रम म्हणून दरवर्षी एक प्रकल्प घेऊन काम करत आहेत.
कापडी पिशव्या बनवण्यासाठी त्यांनी विविध परिसरांत फिरून वापरलेले जुने कपडे गोळा केले. त्यातून त्यांनी जवळपास ५०० कापडी पिशव्या शिवलेल्या आहेत. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांना प्राधान्य देण्याचा आग्रह त्या दुकानदारांकडे धरत आहेत. मात्र, दुकानदारांकडून त्यांना प्रतिसाद मिळत नाही. एक कापडी पिशवी त्या १० रुपयांना विकत आहेत. कापडी पिशव्या विकून नफा कमावण्याचा त्यांचा उद्देश नाही. मात्र, पिशव्यांच्या शिलाईवर झालेला खर्च त्यातून निघावा, इतकीच त्यांची अपेक्षा आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्याची जागृती त्या नागरिकांमध्ये करत आहेत.
महापौरांनी प्लास्टिकमुक्त कल्याण-डोंबिवलीचा संकल्प जाहीर केल्याचे समजताच संघटनेने महापालिकेत देवळेकर यांची भेट घेतली. महापालिका संघटनेकडून कापडी पिशव्या विकत घेऊन त्या नागरिकांना देईल, असे आश्वासन या वेळी देवळेकर यांनी त्यांना दिले.
संघटनेच्या साधना जोशी यांनी सांगितले की, फॅशन आणि चित्रपटांचे मार्केटिंग करावे लागत नाही. चित्रपट लगेच पाहिले जातात. फॅशनचे अनुकरण लगेच केले जाते. प्लास्टिक पिशव्या वापरू नका, यासाठी जागृती करावी लागते. इतकेच नव्हे तर शिक्षित समाजवर्गात जागृतीचे काम करूनही नागरिक प्लास्टिक पिशव्याच वापरतात, हीच खरी खंत आहे. कल्याण-डोंबिवलीतील काही नागरिक ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवतात. महापालिकेकडे वर्गीकृत कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प नसल्याने वर्गीकरणाचा काही उपयोग होत नाही. कचरा वेगळा गोळा करूनही तो एकत्रितपणेच डम्पिंग ग्राउंडवर टाकला जात आहे.

विद्यार्थ्यांना देणार बक्षीस

‘स्वशक्ती’ मधील अमृता मोडक या बालकमंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. त्या म्हणाल्या की, शाळेत विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचरा गोळा करण्यास सांगितले जाते. तो कुठेही फेकून दिला जात नाही. प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्याला प्रोत्साहन दिले जाते. यापुढे बक्षीसही दिले जाणार आहे.

Web Title: Cloth bags that will provide 'self-protection' in Kalyan-Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.