क्लब हाऊस, तरणतलावासाठी संघर्ष

By admin | Published: January 5, 2017 05:35 AM2017-01-05T05:35:59+5:302017-01-05T05:35:59+5:30

मीरा रोेडच्या आरएनए ब्रॉडवे एव्हेन्यू गृहसंकुलातील ८५० सदनिकां मधील रहिवाशांचा त्यांच्या हक्काचे क्लब हाऊस व तरणतलाव ताब्यात मिळवण्यासाठी संघर्ष सुरु आहे.

Club house, struggle for swimming | क्लब हाऊस, तरणतलावासाठी संघर्ष

क्लब हाऊस, तरणतलावासाठी संघर्ष

Next

मीरा रोड/ भाईंदर : मीरा रोेडच्या आरएनए ब्रॉडवे एव्हेन्यू गृहसंकुलातील ८५० सदनिकां मधील रहिवाशांचा त्यांच्या हक्काचे क्लब हाऊस व तरणतलाव ताब्यात मिळवण्यासाठी संघर्ष सुरु आहे. विकसकाच्या संगनमताने बाहेरच्या खाजगी व्यक्तीने क्लब हाऊसवर कब्जा केला आहे. या प्रकरणी महापालिका व पोलिसांकडे सातत्याने तक्रारी करुनही त्यांना न्याय मिळत नसल्याने रहिवाशांनी विकसकाविरोधात फौजदारी कारवाई करण्यासह त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.
मीरा रोडचे हे गृहसंकुल आर.एन. ए. बिल्डरने उभारले असून त्याला सुमारे १३ वर्ष झाली आहेत. संकुलात २४ इमारती तर १४ गृहनिर्माण संस्था आहेत. विकसकाने मंजूर नकाशानुसार संकुलात रहिवाशांसाठी कम्युनिटी हॉल बांधला. अर्थात यात क्लब हाऊस व तरणतलाव रहिवाशांसाठी बांधलेले आहे. त्यासाठी सदनिका खरेदीदारांकडून क्लब हाऊस व तरणतलावाच्या आजीव सभासदत्वासाठी २५ हजार घेतले आहेत. परंतु विकसकाने क्लब हाऊस व तरणतलाव रहिवाशांच्या रितसर ताब्यातच दिलेले नाही. त्यातच काही वर्षापूर्वी विकसकाने बोरिवलीच्या साईबाबानगर येथील केरकर फिटनेस सोल्युशनचे कुणाल केरकर यांना क्लब हाऊस चालवण्यास दिले.
गृहसंकुलातील रहिवाशांसाठी क्लब हाऊस असताना बाहेरच्यांनाही प्रवेश देत केरकर यांनी ५ हजार वार्षिक शुल्क आकारण्यास सुरुवात केली. संकुलाच्या आवारात असलेल्या क्लब हाऊसमध्ये बाहेरील व्यक्ती येत असल्याने तसेच ते भाड्याने दिले जात असल्याने रहिवाशांनी विरोध सुरु केला. यातून झालेल्या वादात केरकरच्या कर्मचाऱ्यांनी रहिवाशांवरच मीरा रोड पोलिसात गुन्हा दाखल केला.
क्लब हाऊस व तरणतलाव रहिवाशांच्या ताब्यात रितसर हस्तांतरण करुन देण्याची मागणी रहिवाशांनी सुरु केली. काही रहिवाशांनी लोकशाही दिनात तक्रारी केल्या. तर ब्रॉडवे एव्हेन्यू सहकारी गृहनिर्माण संघटनेनेही विकसक, महापालिका व पोलिसांकडे सातत्याने क्लब हाऊस, तरणतलाव रहिवाशांना हस्तांतरित करण्यासाठी पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरु केला. पालिकेने आॅगस्ट २०१५ मध्ये विकसक आरएनए बिल्डरला विकास नियंत्रण नियमवालीनुसार १५ दिवसात कम्युनिटी हॉल रहिवाशांना विनामूल्य हस्तांतरण करण्याचे पत्र दिले. शिवाय सुनावणीला बोलावले. त्यानंतर तब्बल वर्षभराने म्हणजेच जुलै २०१६ मध्ये पालिकेने विकसकास अंतिम नोटीस बजावत कम्युनिटी हॉल रहिवाशांना हस्तांतरित करुन १५ दिवसात तसा अहवाल सादर करा अन्यथा अन्यत्र सुरु असलेल्या विकासकामांवर तसेच तुमच्यावर एमआरटीपी अ‍ॅक्ट नुसार कारवाई करण्याचा इशारा दिला.
विकसक आरएनएन कॉर्प यांनी आॅक्टोबरमधील पत्रानुसार क्लब हाऊस व तरणतलाव रहिवाशांना हस्तांतरित केल्याचे महापालिकेस कळवले. केरकर व रहिवाशांनाही विकसकाने पत्र दिले. परंतु केवळ कागदी घोडे नाचवण्याचे काम विकसकाने करत प्रत्यक्ष ताबा मात्र दिलाच नाही. रहिवाशांनी गृहसंकुलात बाहेरुन क्लब हाऊसमध्ये येणाऱ्या व्यक्ती, केरकर व त्यांचे कर्मचारी यांच्या विरुध्द कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली. स्वत: महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी मीरा रोड पोलिसांना कारवाई करण्यासाठी पत्र दिले. पण पोलिसांनी गुन्हाही दाखल केला नाही. पालिका व पोलिस एकमेकांकडे बोटे दाखवत असताना दुसरीकडे पालिकेने विकसकाविरुध्द देखील कारवाई केलेली नाही.
आता पुन्हा रहिवाशांच्या संघटनेने महापालिका आयुक्त, मीरा रोड पोलिसांसह मंत्रालयापर्यंत तक्रारी केल्या असून क्लब हाऊस व तरणतलावाचा प्रत्यक्ष ताबा न देता केवळ उडवाउडवी करणारा विकसक आरएनए कॉर्प विरुध्द मोफा कायद्यासह भादवी व एमआरटीपी अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करुन शहरातील त्याच्या सर्व बांधकामांना स्थगिती द्यावी व काळ्या यादीत टाकावे अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Club house, struggle for swimming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.