क्लस्टरसाठी ८५ वर्षांच्या वृद्धेचे सामान रस्त्यावर टाकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 02:47 AM2018-03-31T02:47:59+5:302018-03-31T02:47:59+5:30
तब्बल ४० वर्षे पागडीवर घेतलेल्या किराणा मालाच्या दुकानाचे टाळे तोडून एका ८५ वर्षीय वृद्धेचे सामान रस्त्यावर टाकून
ठाणे : तब्बल ४० वर्षे पागडीवर घेतलेल्या किराणा मालाच्या दुकानाचे टाळे तोडून एका ८५ वर्षीय वृद्धेचे सामान रस्त्यावर टाकून दुकानावर कब्जा केल्याचा प्रकार हाजुरी गावात २२ मार्च रोजी रात्री घडला. याप्रकरणी थेट अपर पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर संबंंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वत्सला वामन पडवळ (८५), रा. नारायण डायरे चाळ, हाजुरी गाव, ठाणे येथे ५ मार्च १९७९ रोजी ५०० रुपये अनामत रक्कम आणि महिना ६० रुपये भाडेतत्त्वावर पागडीवर १० बाय १० चौरस फुटांचा गाळा पडवळ दाम्पत्याने डायरे यांच्याकडून घेतला. त्याठिकाणी त्यांनी किराणा दुकान सुरू केले. दरम्यान, १८ वर्षांपूर्वी वामन पडवळ यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर वत्सला यांनी दुकान चालू ठेवले. ३५ वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी हे दुकान चालवले.
ठाण्यात क्लस्टर योजना लागू झाल्याने मूळ मालक नारायण डायरे यांची मुले सुरेश आणि गुलाब डायरे यांनी २२ मार्च २०१८ रोजी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान वत्सला यांच्या दुकानाचे टाळे तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील सामान रस्त्यावर टाकले. दुकानातील रोकड घेऊन दस्तऐवजही चोरले. दुकानावर कब्जा करून डायरे बंधूने दुकानाला टाळे लावले.
वत्सला पडवळ यांच्या दुकानाचा १९७९ चा गुमास्ता परवाना तसेच १९८२ या वर्षाची भाडेपावती यात गायब करण्यात आले. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणात तक्रार नोंदवून न घेतल्याने वत्सला यांनी ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांची भेट घेऊन ही कैफियत मांडली.