क्लस्टरच्या सुनावणीत गावठाण, कोळीवाडेही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 03:58 AM2018-08-21T03:58:28+5:302018-08-21T03:58:58+5:30
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला हरताळ; महापौरांकडे तक्रार
ठाणे : गावठाण आणि कोळीवाडे क्लस्टरमधून वगळण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असतानासुद्धा ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाकडून गावठाण आणि कोळीवाड्यामधील नागरिकांना जनसुनावणीसाठी बोलवण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे यासंदर्भात चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीने महापौर मीनाक्षी शिंदे यांना एक पत्र देऊन या जनसुनावण्या रद्द करण्याची मागणी केली आहे.
महापालिकेने शहरातील ४४ भागांसाठीच्या विकास आराखड्यासंदर्भात योजना जाहीर केली आहे. यामध्ये शहरातील गावठाण आणि कोळीवाड्यांचादेखील समावेश आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांनी महापालिकेच्या या कृतीविरोधात आंदोलने उभी केली होती. तसेच या योजनेचा अभ्यास करून त्याला गावठाणासोबत जोडून पाहिल्यावर अनेक धोके समोर आले. अनेक हरकती नोंदवल्या गेल्या होत्या. एकूणच ही योजना भूमिपुत्रांच्या संस्कृतीचा, अस्मितेचा आणि अस्तित्वाचा आणि त्यांच्या हिताचा विचार करण्यात फोल ठरल्याची भावना निर्माण झाली होती. परिणामी, शहरातील गावठाणे, कोळीवाडे आणि पाड्यांमध्ये राहणाऱ्या भूमिपुत्रांनी क्लस्टर योजनेमधून गावठाण, कोळीवाडे आणि पाडे वगळण्याची मागणी केली होती. यातूनच ठाणे शहरातील भूमिपुत्रांसोबत ठाणे ग्रामीण, पालघर, नवी मुंबई, मुंबई आणि रायगड भागातील भूमिपुत्र संस्थांनी एकत्रित येऊन आगरी-कोळी भूमिपुत्र महासंघाची स्थापना केली आहे. या महासंघामध्ये विविध तज्ज्ञांचा समावेश आहे.
भूमिपुत्रांच्या या लढ्याला मतदार जागरण अभियान, स्वराज्य इंडिया, स्वराज अभियान या सामाजिक संस्थांनी पाठिंबा दिल्याने यातून एक मोठी जनचळवळ उभी राहिली. यामध्ये ठाण्यातील सर्वपक्षीय आमदारांनी गावठाण, कोळीवाडे येथे राहणाºया नागरिकांची बाजू हिरिरीने अधिवेशनात मांडली.
जनतेच्या आक्रमकतेपुढे अखेर सरकारला नमते घ्यावे लागले. शेवटी, क्लस्टर योजनेतून गावठाण आणि कोळीवाडे वगळण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला. परंतु, असे असतानाही अद्याप ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाकडून गावठाण, कोळीवाड्यांमध्ये राहणाºया नागरिकांना जनसुनावणीसाठी बोलवण्यात येत असल्याचा आरोप चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीने केला आहे.
महापौर मीनाक्षी शिंदे यांना यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला असून, ही जनसुनावणी रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जर गावठाण, कोळीवाडे क्लस्टरमधून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, तर मग आता ही जनसुनावणी का घेण्यात येत आहे, असा सवाल करून संवर्धन समितीच्या उपस्थितीत ही जनसुनावणी रद्द करण्याची मागणी समितीने महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महापालिकेत तक्रारदारांचा गोंधळ
ठाणे शहरात राबविण्यात क्लस्टर योजनेविरोधात असलेल्या नागरिकांच्या तक्र ारी निकाली काढण्यासाठी सोमवारी महापालिकेत सुनावणी आयोजिली होती. मात्र, मुख्यालयात पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे काही तक्रारदारांनी गोंधळ घालून ती रद्द करण्याची मागणी केली.
जनसुनावणी मोठ्या सभागृहात आणि सक्षम अधिकाºयांच्या उपस्थितीत घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. या प्रकारामुळे मुख्यालयात काही काळ तणावाचे वातावरण होते. सुनावणीसाठी ५० जणांना बोलविण्यात आले होते आणि बसण्यासाठी केवळ १४ जागा होत्या.
वेळेवर सुनावणी सुरू झाली नाही. योजनेबाबत प्रशासनाकडून उत्तरे दिली जात नाही, अशा स्वरु पाचे हे आक्षेप होते. तसेच सुनावणी जबरदस्तीने घेतल्यास नागरिक रस्त्यावर उतरतील असा इशाराही यावेळी देण्यात आला.