क्लस्टरची घरे मालकी हक्कानेच; घरे भाडेतत्त्वावर नाही - एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 01:20 AM2020-02-06T01:20:43+5:302020-02-06T01:20:47+5:30

नगरविकास विभागाची मंजुरी

Cluster houses are by ownership; Houses not on rent - Eknath Shinde | क्लस्टरची घरे मालकी हक्कानेच; घरे भाडेतत्त्वावर नाही - एकनाथ शिंदे

क्लस्टरची घरे मालकी हक्कानेच; घरे भाडेतत्त्वावर नाही - एकनाथ शिंदे

Next

ठाणे : क्लस्टर योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारी घरे भाडेतत्त्वावर दिली जाणार असल्याचा अपप्रचार सुरू असला, तरी ही घरे मालकी हक्कानेच दिली जाणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावावर नगरविकास विभागाने शिक्कामोर्तब केले असून या योजनेत सहभागी होणाऱ्या अधिकृत इमारतींतील रहिवाशांना अतिरिक्त २५ टक्के जागा देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांच्याकडून काहीही रक्कम आकारली जाणार नाही. तसेच, कुठलाही नवा प्रकल्प रेरांतर्गत नोंदणी करणे बंधनकारक असल्यामुळे क्लस्टर योजनेतील प्रकल्पांची नोंदणी होणारच आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

क्लस्टर योजनेंतर्गत मिळणारी घरे लीजवर मिळणार असल्याचा अपप्रचार गेले काही दिवस सुरू होता. परंतु, या योजनेत मालकी हक्कानेच घरे दिली जाणार असल्याची भूमिका पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीपासूनच घेतली होती. आता ते स्वत:च नगरविकासमंत्री असून नगरविकास विभागाने या प्रस्तावावर शिक्कामोर्तबदेखील केले आहे. त्यामुळे क्लस्टर योजनेंतर्गत लाभार्थ्यांना कायमस्वरूपी मालकी हक्काने घरे उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अधिकृत इमारतींतील रहिवाशांना २५ टक्के अतिरिक्त जागा मिळणार

क्लस्टर योजनेत काही ठिकाणी अधिकृत इमारतींचाही समावेश होणार आहे. अशा इमारतींमधील रहिवाशांना त्यांच्या सध्याच्या जागेव्यतिरिक्त २५ टक्के अतिरिक्त जागा दिली जाणार आहे. या अतिरिक्त जागेसाठीदेखील कुठल्याही प्रकारचा खर्च आकारला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रेरांतर्गत नोंदणी बंधनकारक

कुठलाही नवा प्रकल्प अथवा पुनर्विकास प्रकल्प राबवत असताना ५०० चौरस मीटर वा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळावरील प्रकल्प असेल, तर रेरांतर्गत नोंदणी बंधनकारक आहे. त्यामुळे क्लस्टर योजनेतील प्रकल्पांची नोंदणीदेखील रेरांतर्गत होणारच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी क्लस्टरचा शुभारंभ करू नये निर्णय प्रसिद्धीची मागणी : गावठाणे-कोळीवाड्यांचा विरोध कायम

ठाण्यातील सहा क्लस्टरला राज्य शासनाने मान्यता दिली असली, तरी या भागातील गावठाणे आणि कोळीवाड्यांचा विरोध आजही कायम आहे. क्लस्टरसाठी मागविण्यात आलेल्या आलेल्या हरकती, सूचनांवरील सुनावणी अद्याप शासनदरबारी प्रलंबित असून अंतिम अहवाल राज्य शासनाकडे गेला नसल्याने त्यावर अजून धोरणात्मक कायदेशीर कोणतेही निर्णय, चर्चा झालेली नाही. त्यामुळे येथील मोठ्या संख्येने असलेले भूमिपुत्र व ठाणेकर नाराज आहेत. ती नाराजी वाढू नये म्हणून आपण क्लस्टर योजनेचे उद्घाटनच करू नये व हे सुस्पष्टपणे नगरविकासमंत्री यांना सांगून टाकावे, असे आवाहन ठाणे शहर गावठाण कोळीवाडे, पाडे संवर्धन समिती आणि चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीच्या रहिवाशांनी मुख्यमंत्रांना केले आहे.

ठाण्यातील कोळीवाडे, गावठाणे व विस्तारित कोळीवाडे, गावठाणांचे सीमांकन अजून झालेले नाही. क्लस्टर योजनेतून ते वगळले आहेत, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोंडी आश्वासन दिले होते. परंतु, याबाबत लेखी शासन निर्णय झालेला नाही. त्यामुळे कोळीवाडा गावठाणांमधील रहिवासी व त्यात पिढ्यान्पिढ्या राहत असलेला आगरी-कोळी समाज नाराज असल्याचे या संघटनांनी सांगितले.

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून आजतागायत कोळीवाडे, गावठाण व विस्तारित गावठाणांचे कधीही ठाण्यात सरकारी मोजणी होऊन सीमांकन झालेले नाही, हे नगरविकासमंत्री यांना माहीत आहे. ते काही गोष्टी आपणापासून लपवत असल्याचे पत्रात नमूद केले आहे. केवळ स्वत:ची जिद्द व हट्टासाठी आपल्या हस्ते ते ठाण्यात क्लस्टर योजनेचे उद्घाटन करू पाहत असल्याचा आरोपही या बांधवांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून आपण या उद्घाटन सोहळ्यास नकार द्यावा, अशी मागणीही यावेळी त्यात केली आहे.

शासन निर्णय घेऊन आल्यास स्वागत 

विस्तारित गावठाण, कोळीवाडे, पाडे हे क्लस्टर योजनेतून वगळले आहेत, असा ल्खिित शासन निर्णय प्रसिद्ध करून तो घेऊनच ठाण्यात आगमन करावे. तेव्हा सर्व भूमिपुत्र व ठाणेकर आपले स्वागत करण्यासाठी उत्स्फूर्तपणे स्वत: स्वागत करण्यासाठी ठाण्याच्या प्रवेशद्वारावर येतील, असेही त्यांनी सांगितले आहे.

भूमिपूजन कार्यक्रमावर भाजपचा बहिष्कार निरंजन डावखरेंची माहिती : देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण न दिल्याने निषेध

ठाणे शहरातील क्लस्टर प्रकल्प साकारण्यात महत्त्वाची भूमिका बजाविलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाला न बोलाविल्याच्या निषेधार्थ भाजपने कार्यक्र मावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष, आमदार निरंजन डावखरे यांनी बुधवारी पत्रकाद्वारे दिली.

एकेकाळी क्लस्टरला मंजुरी दिल्याबद्दल शिवसेनेच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या आभाराचे बॅनर लावले होते. मात्र, आता त्यांना भूमिपूजन कार्यक्र माचे निमंत्रण देण्यास शिवसेना का विसरली, असा आरोप करत, आवश्यक मंजुरी मिळाली नसतानाही क्लस्टरच्या उद्घाटनाची लगीनघाई का, असा सवाल डावखरे यांनी सोमवारी केला होता. त्यानंतर, शिवसेना नेत्यांनी क्लस्टर प्रकल्पाच्या यूआरपीला मंजुरी मिळवून मंगळवारी अधिकृत घोषणा केली.

हजारो नागरिकांच्या हितासाठी क्लस्टर प्रकल्प हा अत्यावश्यक आहे. या प्रकल्पाला भाजपचा पाठिंबा आहे. यातून गावठाणे व कोळीवाडे वगळण्याच्या मागणीवर भाजपा ठाम आहे. त्याचबरोबर, या प्रकल्पाचे पारदर्शकपणे काम पूर्ण होण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करू, अशी ग्वाहीही डावखरे यांनी दिली.

फडणवीस हेच क्लस्टरचे भाग्यविधाते

देवेंद्र फडणवीस हे क्लस्टरचे भाग्यविधाते आहेत. त्यामुळे त्यांना शिवसेनेने सन्मानाने बोलवायला हवे होते. मात्र, त्यांना निमंत्रित न केल्यामुळे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या प्रकाराचा निषेध करून भाजपने भूमिपूजनाच्या कार्यक्र मावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्र मात भाजपाचे खासदार, आमदार, नगरसेवकांबरोबरच कार्यकर्ते सहभागी होणार नाहीत, असे डावखरे यांनी सांगितले.

 

Web Title: Cluster houses are by ownership; Houses not on rent - Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.